साडीची अलग तऱ्हा!

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन,मुंबई

समारंभ वेगळा असेल तर साडीही नवीच हवी असा प्रत्येक स्रीचा अट्टाहास असतो. कारण परत पुन्हा तेच लोक समारंभात येणार असतील तर एकदा नेसलेली साडी नेसता येत नाही. मग आणलेल्या साडय़ा राहातात पडून… आणि नवीन साडय़ांची खरेदी जोमात केली जाते. पण घरात पडून राहिलेल्या रेशमी साडय़ांचं काय? आहे… त्यावरही उपाय आहे.

रेशमी साडय़ांपासून ड्रेस बनवायचा खरा, पण त्यासाठी खास सिल्क साडीच असली पाहिजे असंही नाही. साधारण समारंभाला सिल्क साडी का नेसायची? मस्त बॉर्डर असलेली कॉटन साडी, एखादी तलम माहेश्वरी किंवा ब्लॉक प्रिंट असलेली साडी यासाठी मस्त चालून जाईल. नाहीतर या साडीपासून बनवलेले हैद्राबादच्या मंगलगिरी कॉटन किंवा खणाचं कापडाचे ड्रेसेसही सुंदर दिसतील आणि ही स्टाईल इतर सगळ्याजणींपासून वेगळी उठून दिसेल हे वेगळं सांगायला नको. दुसरं म्हणजे शॉर्ट ड्रेसेससाठी मात्र सिल्क साडय़ाच हव्यात. अर्थात त्या टिपिकल काठपदर नसल्या तरी हरकत नाही. रूंद काठ असलेल्या साडय़ाही चालतील.  काठांचा कधी योकसाठी तर कधी घेरासाठी उपयोग करून छान सेमीफॉर्मल ड्रेस बनवता येईल. काठपदर असलेल्या बनारसी किंवा साऊथ सिल्क साडय़ांचं काय करायचं असा प्रश्न पडतोच. कारण एकतर या साडय़ा खूप तलम असतात आणि त्यांच्या बॉर्डरही वर्षानुवर्षे चांगल्या टिकू शकतात. या बॉर्डर्सचा कलात्मक वापर करून ड्रेसेस किंवा इव्हिनिंग गाऊन्स बनवता येतील.

घरात पडून राहिलेल्या चांगल्या साडय़ांचे पल्लू ड्रेसेसही बनवता येतील. हा नी-लेंग्थ ड्रेसचा थोडा वेगळा प्रकार म्हणता येईल. कारण यात समोरून वन शोल्डर ड्रेस, पण मागून झोकात सोडलेला पदर असं कॉम्बिनेशन आहे. यासाठीही कोणतीही सहसा न फुगणारी, मऊसूत साडी या प्रकारासाठी एकदम बेस्ट ठरेल. यातही घेरदार ड्रेस किंवा स्ट्रेट फिट असे दोन्हीही पर्याय सुंदर दिसतील.

काला जादू चलेगा!

काळा रंग सगळ्यांचा आवडता… कारण काळ्या रंगाच्या कपडय़ात माणूस थोडा बारीक दिसतो. अशा काळ्या काठपदराच्या साडय़ा असतील तर त्यांच्या काठांचा उपयोग करून कुर्ती, नी लेंग्थ ड्रेसेस किंवा गाऊन्स बनवता येईल. यात वेगवेगळ्या प्रकारची कलाकारी दाखवता येईल. शिवाय ड्रेसही हटके दिसेल. आजकाल जॅकेट्सचीही खूप चलती आहे. प्लेन ज्यूट किंवा खादी सिल्कच्या साडीच्या कापडाला वेगळया लेसची बॉर्डर लावता येईल. साडीतून शॉर्ट ड्रेस बनवून उरलेल्या कापडाचा छान उपयोग होईल ना? जॅकेट्समध्येही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हांला हवा तो प्रकार तुम्ही निवडू शकता. नाहीतरी कलमकारी, इकत, पटोला, बनारस सिल्क कधी कामाला येणार मग?