इथे होते पाचव्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना

काशीराम गायकवाड । कुडाळ

कोकणात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जातो. सर्वजण भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी  सार्वजनिक व घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करून पूजन करतात. मात्र कुडाळ – सांगिर्डेवाडीतील कृष्णा शंकर साळगांवकर यांच्या घरी गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी नवीन गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. हा गणपती वर्षभर ठेवला जातो हे विशेष आहे. साळगांवकर कुटूंबियांचा पाच पिढ्यांचा वारसा जपणारा हा गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरत असून अशी अनोखी परंपरा जपणारा हा कोकणातील एकमेव गणेशोत्सव आहे.

सोमवारी सायंकाळी मागील वर्षभर ठेवण्यात आलेल्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर नवीन गणेश मुर्तीची मोठ्या थाटामाटात  प्रतिष्ठापना  करून विधीवत पूजा करण्यात येणार असल्याचे साळगांवकर यांनी सांगितले. गणेशोत्सवाबाबत अनेक परंपरा  पाहावयास मिळतात. अशीच एक अनोखी परंपरा हे साळगांवकर कुटूंबीय जपत आहे. मुळ  कविलकाटे येथील हे साळगांवकर कुटूंबीय काही वर्षापूर्वी कुडाळ-सांगिर्डेवाडी येथे स्थायिक झाले. या कुटूंबातील कृष्णा साळगांवकर हे स्वतः गणेशमुर्तीकार असून गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आजही ते भक्तीभावाने मोठ्या उत्साहात जोपासत आहेत. साळगांवकर ते त्यांच्या घरात पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गणेशमुर्ती बनवण्यास सुरूवात करण्यापूर्वी इतर गणपती शाळांप्रमाणे मुहूर्ताचा गणपती बनवतात. मात्र हा गणपती घरात इतरत्र न ठेवता हाच गणपती पूजेला लावतात. या मुहूर्ताच्या गणपतीसोबत आणखी एक लहान गणपती ठेवला जाते.

कुठलीही मोडतोड न करता जसा आकार येईल अशी गणेश मुर्ती बनविली जाते. या गणेश मुर्तीचे चतुर्थीच्या पहिल्या दिवशी पूजन न करता पाचव्या दिवशी मागील वर्षभर  घरात ठेवलेल्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर नवीन गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन केले जाते. साळगांवकर यांची आर्थिक परिस्थिती थोडी बेताची असली तरी वर्षभर हे कुटूंबीय मनोभावे गणेशाची विधीवत पूजा, आराधना करतात. दररोज पूजा, आरती यासारखे नित्याचे कार्यक्रम घरात वर्षभर होतात. माघी गणेश जयंती हा उत्सवही विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो.

साळगांवकर कुटूंबीय आपल्याला वर्षभरात मिळालेले सर्व आर्थिक उत्पन्न हा आपल्या घरातील गणेशाचाच आशिर्वाद आहे असे मानून नोकरी व्यवसायातून  आलेले सर्व आर्थिक उत्पन्न सर्वप्रथम या गणरायाच्या चरणी ठेवून नंतर त्याचा स्वखर्चासाठी वापर करतात. गणेशमुर्ती बनविण्यासाठी विपुल व वैभव या दोन्ही मुलांचेही सहकार्य लाभत असल्याचे साळगांवकर यांनी सांगितले. साळगांवकर कुटूंबियांचा पाच पिढ्यांचा वारसा जपणारा हा गणेशोत्सव खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण व आगळा वेगळा ठरत आहे.