आमचा संसार रस्त्यावर आणताना तुम्हाला पाझर फुटत नाही काय?

62

नवी मुंबई – रक्ताचे पाणी करून मिळविलेला पैसा आम्ही या घरात टाकला… आता ही घरेच आमच्यापासून हिरावून घेतली जात आहेत… बरबाद झालो… कच्च्याबच्च्यांना घेऊन जायचे कुठे?… ऐन परीक्षेच्या काळात आम्ही रस्त्यावर आलो… हात जोडतो आम्हाला राहू द्या.. आम्हाला बेघर करताना, आमचा संसार रस्त्यावर आणताना सरकारला पाझर फुटत नाही काय? असा आक्रोश आज दिघा येथील दुर्गामाता प्लाझा व अमृतधाम या इमारतीतील रहिवाशांनी केला.

उच्च न्यायालयाने सिडको व एमआयडीसीच्या भूखंडावरील ९९ अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीच्या जागेवरील पार्वती, शिवराम व केरू प्लाझा या तीन निवासी इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, तर अंबिका, कमाकर, पांडुरंग, मोरेश्वर, भगतजी या इमारती सील करण्यात आल्या आहेत. सिडकोच्या भूखंडावरील चार इमारतींना कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यातून सिडकोच्या ताब्यात देण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यापैकी दुर्गामाता प्लाझा व अमृतधाम या कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असणाऱया इमारतींना टाळे ठोकत त्या सिडकोच्या ताब्यात देण्याची कारवाई आज करण्यात आली आहे. यामुळे दुर्गामाता प्लाझामधील ५० कुटुंबे, अमृतधाममधील ४२, अवधूत छाया ४६ व दत्तकृपामधील २४ असे १६२ कुटुंबे बेघर होणार आहेत. या इमारतींमधील रहिवाशांची भाडय़ाची घरे शोधण्यासाठी वणवण सुरू आहे. ऐन परीक्षांच्या काळात सुरू असणाऱया कारवाईमुळे नेमके जायचे कुठे आणि संसार थाटायचा कुठे, असा प्रश्न दिद्यावासीयांसमोर उभा राहिला आहे.

इमारतींना ठोकणार टाळे

अवधूत छाया व दत्तकृपा या इमारतींना टाळे ठोकण्यात येणार असून येत्या २ मार्च रोजी सिडकोच्या भूखंडावरील अन्य दोन इमारतींना टाळे ठोकण्यात येणार आहे. तसेच एमआयडीसीच्या भूखंडावरील अगिवली हाईट्स, सावित्री, सीताराम पार्क, नाना पार्क, कल्पना हाईट्स, लाल किल्ला, एकवीरा या इमारतीदेखील कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असून त्यांनाही मार्च महिन्यात सील करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

महिला पत्रकार कॅमेरामनला मारहाण

दिघा येथे एमआयडीसीच्या जागेवर उभ्या असलेल्या चार इमारती आज सील करण्यात आल्या. या कारवाईचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीच्या पत्रकार स्वाती नाईक आणि कॅमेरामन संदीप भारती यांच्यावर स्थानिक रहिवाशांनी हल्ला केला. हे दोघेही जबर जखमी झाले. त्यांना ऐरोली येथील विघ्नेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या