Digital Health Mission – हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य ओळखपत्र मिळणार

710

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये भविष्यातील काही योजनांबाबत माहिती दिली. यामध्ये राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियानाचा समावेश आहे. हे अभियान आजपासून म्हणजेच 15 ऑगस्ट 2020 पासून सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.  या अभियानाअंतर्गत देशातील नागरिकांना एक आरोग्य ओळखपत्र दिले जाणार आहे.

या ओळखपत्रामध्ये तुमच्या सगळ्या चाचण्या, तुम्हाला कोणत्या डॉक्टरने कोणतं औषध दिलं आहे, औषध केव्हा दिलं आहे, चाचण्यांचे अहवाल हे सगळं साठवून ठेवलं जाणार आहे. हे मिशन देशातील आरोग्य क्षेत्रात क्रांती करणारे ठरेल असेल पंतप्रधान म्हणाले.

कोरोनामुळे यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम दरवर्षीपेक्षा वेगळा होता. शाळकरी मुलांना यावेळी लाल किल्ल्यावर जाऊन पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही. उपस्थित मान्यवरांमध्ये सामाजिक अंतर राखण्यात आले होते. यावर्षी नेतेमंडळी, अधिकारी, राजदूत, माध्यमांचे प्रतिनिधी मिळून फक्त 4 हजार लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. कोरोना संक्रमणाची शक्यता टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षीपर्यंत या कार्यक्रमाला 10 हजार जणांपेक्षा अधिक लोकं उपस्थित असायची. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये कोरोनाबाबतचा उल्लेख करताना म्हटले की देशातील संशोधक कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.

देशामध्ये कोरोनाविरूद्धच्या 3 लसींचे संशोधन सुरू आहे. या तीनही लसी वेगवेगळ्या चाचण्यांच्या पातळीवर असल्याचे ते म्हणाले. या लसी सगळ्या चाचण्या पार करतील आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवला जाईल तेव्हा या लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कमीत कमी वेळेत प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस कशी पोहोचेल याबाबतची योजना तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या