‘गोदावरी’  चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेल्या निखिल महाजन यांच्या ‘गोदावरी’  चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार आहे.  3 जूनपासून हा चित्रपट जिओ सिनेमावर विनाशुल्क स्ट्रीम करता येणार आहे.

जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव आणि संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी राहणाऱया एका कुटुंबाभोवती फिरते. भावना, आव्हाने आणि मानवी नातेसंबंधांच्या नाजूक पदरांचा वेध हा चित्रपट सुंदररीत्या घेतो. नदीच्या रम्य पार्श्वभूमीवर घडणाऱया या चित्रपटाची कथा निखिल महाजन व प्राजक्ता देशमुख यांची आहे. 2021 मध्ये व्हँकुव्हर चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. खिळवून ठेवणारी कथा आणि अप्रतिम अभिनयासाठी या चित्रपटाचे तेथे खूप कौतुक झाले.