दोन दिवसांचे डिजिटल महिला साहित्य संमेलन

स्त्री आधार केंद्र, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने ‘साहित्य मंजिरी’ या महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन येत्या २५ आणि २६ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते ५ या वेळेत डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून पार पडणार आहे.

महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा लेखिका मंगला गोडबोले असून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी, पहिल्या सत्रात ‘महिलांच्या सर्जनशील साहित्याची नवी परिमाणे’ या परिसंवादात मोनिका गजेंद्रगडकर, राही भिडे, रोहिणी निनावे या लेखिकांचा सहभाग असणार आहे तर वैजयंती कुलकर्णी या परिसंवादाचं सूत्रसंचालन करतील. दुसऱ्या सत्रातील कवयित्री संमेलनात अनुपमा उजगरे, अंजली कुलकर्णी, छाया कोरगावकर सहभागी होतील.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘लेखिकांच्या नजरेतून बदलते नातेसंबंध’ या परिसंवादात सिसिलिया काव्र्हालो, नीरजा, शिल्पा कांबळे सहभागी होणार असून सूत्रसंचालन डॉ. मंजुषा मोळवणे करतील. दुसऱ्या सत्रातील कवयित्री संमेलनात नीरजा, योगिनी राऊळ, मंदाकिनी पाटील यांचा सहभाग असणार आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे उद्घाटन सत्रात सहभाग होणार आहेत. मिती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी https://www.facebook.com/mitigroup   या लिंकला भेट द्यावी.  संपर्क – ९९३०११५७५९, ९९६०३२५१११.

आपली प्रतिक्रिया द्या