गाईच्या दुधात सोने असते म्हणून ते पिवळसर दिसते, भाजप नेत्याचे विधान

950

आपल्या भडक विधानांसाठी बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष नेहेमी वाद ओढावून घेत असतात. घोष पुन्हा एकदा वादात सापडले आहे. गोमांस खाणाऱ्यांवर घोष यांनी टीका केली आहे. टीका करत असताना घोष यांनी गोमांस खाणाऱ्या बुद्धीजीवींवर विशेष करून टीका केली आहे. या वर्गाने त्यांना काय हवे ते खावे मात्र ते रस्त्यावर कशाला, घरात खावे असे घोष म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालमधील बर्धमानमध्ये ‘गोप अष्टमी’ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलत असताना घोष म्हणाले की ‘स्वत:ला पुढारलेली आणि बुद्धीजीवी म्हणवणारी मंडळी रस्त्यावर गोमांस खातात त्यांना माझे हे सांगणे आहे की त्यांनी कुत्र्याचंही मांस खावं, त्यांचे आरोग्य चांगले राहील. त्यांना जे खायचं ते त्यांनी खावं मात्र ते रस्त्यावर कशाला खावं, त्यांनी ते स्वत:च्या घरात खावं’ असं घोष म्हणाले आहेत. गाय ही आमच्यासाठी मातेसमान आहे. तिचे दूध पिऊन आम्ही जिवंत राहतो. जर माझ्या आईसोबत कोणी गैरव्यवहार केला तर त्यांच्याशी जसे वर्तन करायला हवे तसेच आम्ही करू असे घोष म्हणाले. हिंदुस्थानची धरती ही पवित्र आहे आणि इथे गायींची हत्या आणि तिचे सेवन हा अपराध असल्याचं घोष यांचं म्हणणं आहे.

घोष यांनी या भाषणामध्ये म्हटले की ‘हिंदुस्थानातील गायी या खऱ्या अर्थाने विशेष असतात. या गायींच्या दुधामध्ये सोने आढळते, म्हणून ते दूध पिवळसर दिसते’ या देशामध्ये भगवान श्रीकृष्णाबद्दलचा आणि गोमातेबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे गायींची हत्या हा एक भयंकर अपराध आहे त्यामुळे गोवंश हत्येचा आम्ही सातत्याने विरोध करू असंही घोष यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या