रंगपट – गणेश चतुर्थीचा तो दिवस!

ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव जागवत आहेत ऐन चतुर्थीला घडलेल्या एका संवेदनशील घटनेच्या स्मृती…

एका वर्षी ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली की, ती मी कधीच विसरू शकत नाही. या घटनेला आता 14 वर्षे झाली असली तरी गणेश चतुर्थी आली की, ‘तो’ प्रसंग मला प्रकर्षाने आठवतो. सन 2001 मध्ये मी नोकरीतून ‘व्हीआरएस’ घेतली आणि पूर्णवेळ नाटक करायचे ठरवले. कारण त्यावेळी माझे ‘जाऊ बाई जोरात’ हे नाटक रंगभूमीवर तुफान सुरू होते. त्याच वेळी मी अजून दोन-तीन नाटके करत होतो. त्यातले एक होते ते ‘बंटी आणि बबली’! आमच्या या नाटकाचा नाशिकला रात्रीचा प्रयोग लागला होता. त्या दिवशी दुपारी आम्ही सगळे नाशिकला जाण्यासाठी निघालो, पण आमची बस ठाण्यामध्ये पोहोचताच बिघडली. आमच्या ड्रायव्हरने थोडी डागडुजी करून बस सुरू केली, पण कल्याणला पोहोचल्यावर तर बस पूर्णतः बंद पडली. तोपर्यंत साडेचार वाजले होते. नाशिकला पोहोचायचे कसे? असा प्रश्न आम्हाला पडला होता. या नाटकात निर्मिती सावंत, सतीश सलागरे आदी कलाकार काम करत होते.

आम्ही आमची बस तिथल्या एका पेट्रोल पंपला लावली आणि पुढे काय करायचे या विचारात होतो. त्या सुमारास निर्मिती सावंतची ‘गंगूबाई’ फॉर्ममध्ये होती. त्यामुळे तिची ‘क्रेझ’ निर्माण झाली होती. आम्ही निर्मितीला म्हटले की, आपण मेन रोडला थांबलो आहोत. तुला कुणी ओळखले तर आपल्याला काहीतरी मदत मिळू शकेल. आमचा अंदाज अचूक ठरला. त्या गावातल्या एका सद्गृहस्थांनी थांबून आमची विचारपूस केली. त्यांनी गावात फोनाफोनी करून एक ‘सुमो’ मागवून घेतली. पण बॅकस्टेजवाले आणि नाटकाचा सेट नाशिकपर्यंत न्यायचा कसा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. तेवढय़ात जळगावला जाणारा एक ट्रक तिथून चालला होता. केळी रिकामी करून मुंबईहून तो जळगावला रिकामा जात होता. भेटलेल्या त्याच सद्गृहस्थाने आम्हाला नाशिकला सोडण्याची विनंती त्या ट्रकवाल्याला केली. त्याने सर्वांना नाशिकला सोडले. साडेदहाला प्रयोग सुरू झाल्यानंतर रात्री अकरा वाजता माझ्या धाकटय़ा मुलीचा मला फोन आला आणि ती म्हणाली, मम्मी बाथरूममध्ये पडली आहे, तिच्या डोक्याला लागले आहे आणि ती काहीच हालचाल करत नाही. मी तिथे नसल्याने तिने तिच्या मावसभावांना वगैरे तोपर्यंत बोलावून घेतले. माझी मोठी मुलगी मीरा रोडला सासरी होती आणि रात्री रेल्वे बंद झाल्याने ती काही माझ्या घरी पोहोचू शकणार नव्हती. धाकटय़ा मुलीनेच नातेवाईकांच्या मदतीने तिच्या आईला एका खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तिला मोठय़ा हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले.

नाशिकचा प्रयोग संपल्यावर दुसऱया दिवशी सकाळी 6 वाजता मी हॉस्पिटलला पोहोचलो. माझी पत्नी ‘आयसीयू’मध्ये होती आणि काहीच हालचाल होत नव्हती. दोन दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. वास्तविक, ती घरात जेव्हा पडली तेव्हाच कोमात गेली असावी. कारण पुन्हा ती शुद्धीवर आलीच नाही. माझ्या मेव्हणीचा मुलगा त्या वेळी हॉस्पिटलला थांबला होता आणि ‘त्या रात्री’ दीड वाजता मला त्याचा फोन आला की, ‘मावशी गेली’. ही रात्र होती ती गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीची! दुसऱया दिवशी सकाळी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी मी हॉस्पिटलला जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करून तिचे पार्थिव घरी आणले. लोकांच्या घरी गणपतींचे आगमन होत होते आणि आम्ही मात्र वेगळ्या प्रक्रियेत गुंतलो होतो. दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. खरे तर मनातल्या अशा प्रकारच्या आठवणी आपण सहज शेअर करू शकत नाही. अशा आठवणी मनातच जपून ठेवायला लागतात, पण गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला की, आजही मला खूप अस्वस्थ झाल्यासारखे वाटते हेही तितकेच खरे!

शब्दांकन – राज चिंचणकर