लिखित -वाचिक

>> दिलीप जोशी
khagoldilip@gmail.com

‘दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडी वाचित जावे’ असं संतवचन. एक काळ असा होता की माणसांचा संवाद केवळ ‘वाचिक’च होता. कारण ‘भाषा’ उक्रांत होत होत्या. शब्दांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं. खाणाखुणा आणि वन्य जीवनाशी निगडित ध्वनी हे संवादाचं साधन होतं. … पण माणसं बोलायला लागली. त्यांच्या त्या ध्वनींचे शब्द तयार झाले, त्यातून वाक्य जन्माला आली. व्याकरण वगैरे गोष्टी फारच पुढच्या. आधी परस्परांना आपण काय बोलतोय ते समजणं महत्त्वाचं होतं. टोळीने, गिरीकंदरात राहणारे माणसांचे समूह तिथल्या एकूणच निसर्गाशी एकरूप होणारा ध्वनी संवाद साधत होते. हळूहळू या साऱयाला शिस्त येऊ लागली. विशिष्ट ध्वनी म्हणजे विशिष्ट अर्थवाही शब्द किंवा वाक्य याची जाणीव झाल्यावर ती सर्वमान्य झाली.

जगभरचे विविध मानवी समूह आपापल्या ध्वनिप्रणाली नकळत विकसित करत होते. त्यातून माणसाची ‘भाषा’ उगम पावली, परंतु प्राण्यांप्रमाणे माणसाची भाषा ‘ग्लोबल’ नव्हती. कावळ्य़ाची ‘कावकाव’ किंवा गाईगुरांचं हंबरणं, चिमण्यांचा चिवचिवाट जगभर सारखाच असतो. प्राणी बदलला की त्याची ध्वनी अभिव्यक्ती बदलते. पण माणूस नावाच्या बुद्धिमान प्राण्याने संवादासाठी विविध ध्वनी आविष्कार स्वीकारले इतके की दर दहा कोसांवर माणसांची भाषा बदलते असं म्हटलं जाऊ लागलं. या ध्वनीला नंतर ‘आकार’ देण्यात आला तेच अक्षर. एकाच उच्चाराला विविध पद्धतीने आकार देऊन त्याचं ‘नोटेशन’ होऊन लिपी तयार झाली. लिपीमध्येही सर्व मानवी समूहाच्या अभिव्यक्तीची सुसूत्रता नव्हती. तीन-चारशे किलोमीटर दूर गेलं की तिथे राहणाऱया लोकांची भाषा आणि लिपीसुद्धा निराळी असं चित्र जगभर दिसू लागलं. पुढे त्या त्या भाषांची व्याकरणं आली. त्यात उत्तम वाङ्मय निर्माण झालं. विविध भाषांनी माणसाचे जीवन समृद्ध बनवलं. आपल्याकडेही छपाईपूर्व काळात बऱ्याच कथा, कविता मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आल्या. लोकगीतं, जात्यावरच्या ओव्या यांचे कर्ते कोण याचा थांगपत्ता लागणं तसं कठीणच.

कालगती अव्याहत सुरू असते. नित्यनवीन शोध लागत असतात. आपल्या जीवनशैलीत कळत-नकळत बदल घडवत असतात. प्रदेशानुसार आणि काळानुसारही भाषा बदलते. शे-दीडशे वर्षांपूर्वीचे बरेचसे शब्द-बोल ‘आऊटडेटेड’ वाटू लागतात. मला संकल्पना नवे शब्दही तयार करतात. रोजच्या बोलण्यातला बराचसा भाग ते व्यापून टाकतात. आता हेच पाहा ना, पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी कॉम्प्युटर, त्याची आज्ञावली, इंटरनेट, ई-मेल, सेलफोन त्यावरची विविध ऍप्स, फेसबुक हे शब्द तरी कानावरून गेले होते का? प्रगत देशात या प्रणालीची नुकती कुठे सुरुवात होत होती. बघता-बघता या महाजालाने सारं विश्व व्यापून टाकलं. संदेशांची देवाण-घेवाण क्षणार्धात होऊ लागली. ‘हस्तलिखित’ पत्र पाठवणं म्हणजे गोगलगायीसारखं हळू ‘स्नेल मेल’ असल्याचा वाप्रचार सुरू झाला. ई-मेल करणं म्हणजे विशेष काही तरी आहे असं तेव्हा वाटायचं. मग वेब कॅमेरा आला. नुसतं लिहिण्यापेक्षा थेटच बघता बोलता येऊ लागलं. हजारो मैल दूर असलेली आपली माणसं क्षणात समोर दिसू लागली. ‘कधीतरी मुलाचा फोन येईल म्हणून व्याकूळ होणाऱ्या ‘संध्याछाया’ नाटकातल्या नाना-नानींचा काळ मागे पडला. त्यानंतर विविध ऍप्स आली. सगळा संपर्क सोपा नि स्वस्तही झाला. सुरुवातीला त्याचं अप्रूप, कौतुक झालं… आणि हळूहळू लिखित चर्चा घडू लागल्या. मतमतांतरं व्यक्त होऊ लागली. त्यांचे गट तयार झाले. वादविवादात कालचे मित्रसुद्धा विरोधी भूमिका घेत पोटभर (किंवा बोटभर) वाद घालू लागले. टोकाची मतं परस्परांना टोचू लागली. त्याचबरोबर या साधनांनी अनेक विधायक गोष्टीही परस्परांना लगेच समजू लागल्या. गरजवंतांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येऊ लागले.

कोणतंही संशोधन हे अलिप्तच असतं. त्याचा वापर कसा करावा हे वापरणाऱ्याच्या कुवतीवर आणि बुद्धीवर अवलंबून असतं. लिखित चर्चेतून निष्कारण उद्भवणाऱ्या वादांवर कॅलिफोर्नियातल्या काही संशोधकांनी विचार केला. चांगली शहाणीसुरती माणसं एकदम एकेरीवर का येतात याचं उत्तर त्यांना त्यांच्यापुरतं मिळालं ते असं की, अशा लिखित चर्चा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून चर्चा केली तर परस्परांना अधिक समजून घेता येतं. म्हणजे बोलून एकमेकांशी संवाद साधण्याकडे पुन्हा कल वळला तर माणसांमधला परस्पर संवाद सौहार्दाचा होऊ शकतो असा त्यांच्या एकूण म्हणण्याचा गोषवारा अनेकदा माणसामाणसांमध्ये मतभेद चुकीच्या गृहीतकावर किंवा काही ऐकीव माहितीवर आधारित असतात. क्षणोक्षणी या ना त्या गोष्टीवर मत व्यक्त करणारी माणसं प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार करतात ठाऊक नाही. ज्ञान वाढविण्यासाठी दिसामाजी काहीतरी ते लिहावे आणि वाचावे हे योग्यच असलं तरी ‘काहीतरीच’ लिहिणे अपेक्षित नाही. त्यामागे तारतम्य हवे आणि त्यासाठी चिंतन हवे. कारण ‘अभ्यासोनी प्रगटावे’ असंही संतवचन आहेच. चिंतन केलं तर ‘शब्दविण संवाद’सुद्धा होऊ शकतो. पण क्षणिक उैर्मीतून काही लिहिलं – बोललं तर ते ‘शब्द बापुडे केवळ वारा’ असं ठरण्याचीच शक्यता अधिक.