गांधीजी आणि शास्त्रीजी

858

>>दिलीप जोशी<<

[email protected]

आज महात्मा गांधींची जयंती. गांधीजींच्या मार्गाने चाललेल्या भूतपूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही आजच जयंती. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाने देशावरच नव्हे तर जगावर मोहिनी टाकली. त्यांच्या विचारधारेशी सहमत असलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुण वर्गातून पुढे उत्तुंग नेते निर्माण झाले. जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल या गांधी-शिष्यांची नावं तर सर्वांनाच ठाऊक आहेत, परंतु दक्षिणेत राजाजी, बंगालमध्ये सरोजिनी नायडू, महाराष्ट्रात विनोबा भावे, अच्युतराव पटवर्धन, यशवंतराव चव्हाण अशी देशभरातली कितीतरी नावं सांगता येतील.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या नेत्यांकडे देशाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आली. जवाहरलाल देशाचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांचं देखणं व्यक्तिमत्त्व, देशात आणि जगात उंचावलली प्रतिमा यामुळे नेहरूंनंतर देशाचं नेतृत्व कुणाकडे जाईल याविषयीची चर्चा नेहरूंच्या वृद्धापकाळात होत असे. ‘‘आफ्टर नेहरू हू?’’ म्हणजे ‘‘नेहरूंनंतर कोण?’’ या प्रश्नाला नेहरू जाईपर्यंत काही निश्चित उत्तर मिळालं नाही आणि पंडितजींनीही आपला ‘उत्तराधिकारी’ ठरवला नाही. 1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धातील दारुण पराभवानंतर नेहरू खचले. 1964 मध्ये त्यांचं देहावसान झालं. सारा देश सुन्न, स्तब्ध झाला. मला आठवतंय, आम्ही आकाशवाणीवर नेहरूंच्या निधनाचं वृत्त ऐकलं होतं. घराघरात विषण्णतेचं वातावरण होतं. हजारो लोक रेल्वेने दिल्लीकडे निघाले होते. एवढय़ा मोठय़ा नेत्याच्या जाण्यानंतर पुढचे पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता देशाला होती. काँग्रेसने नेहरूंच्या मंत्रिमंडळात असलेल्या लालबहादूर शास्त्री यांची निवड केली आणि 9 जून 1964 रोजी शास्त्री हिंदुस्थानचे दुसरे पंतप्रधान झाले. नेहरूंच्या तुलनेत शास्त्रीजींचं व्यक्तिमत्त्व अगदी साधं होतं. सर्वसामान्य हिंदुस्थानींना आपल्यातलंच वाटावं असं. जेमतेम पाच फूट उंचीच्या या माणसात विलक्षण कणखरपणा मात्र होता. नेहरूंच्या पश्चात देशाचा राजशकट सांभाळणं सोपी गोष्ट नव्हती, पण शास्त्रीजींनी ते आव्हान लीलया पेललं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं ते मूर्तिमंत प्रतीक ठरले. टिळकयुगात स्वराज्यासाठी झालेली जनजागृती आता गांधीजींच्या नेतृत्वाखाली व्यापक होत होती. 1921 मध्ये काशी येथे पंडित मदनमोहन मालवीय आणि गांधीजी यांची मोठी सभा झाली. गांधीजींच्या भाषणातून स्फूर्ती घेऊन तरुण लालबहादूरने ब्रिटिश सरकारविरोधी आंदोलनात उडी घेतली आणि त्यांना पहिल्यांदा अटक झाली. त्या काळात शाळा-कॉलेज सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू होत होत्या. महाराष्ट्रात टिळक-आगरकरांनी अशी संस्था पूर्वीच सुरू केली होती. 1921 मध्ये गांधीजींच्या हस्ते काशी विद्यापीठाचं उद्घाटन झालं आणि लालबहादूर तिथे शिक्षण घेऊ लागले. या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांमध्ये त्यांचं नाव नोंदलं गेलं. तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्राची पदवी घेताना त्यांना ‘शास्त्री’ संबोधण्यात आलं आणि तेव्हापासून श्रीवास्तव हे आडनाव मागे पडून लालबहादूर शास्त्री झाले.

1930 मध्ये गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. शास्त्रीजींनी त्यात भाग घेतला आणि त्यांना अडीच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. सुटका झाल्यावर लगेच 1942 चा लढा सुरू झाला आणि शास्त्रीजींनी त्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं. गरीब परिस्थितीतून एका ध्येयनिष्ठsने स्वतःला घडविणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांपैकी शास्त्रीजी एक होते. एकेकाळी शाळेत जाताना डोक्यावर पुस्तकं बांधून पोहत नदी पार करण्याचे कष्ट त्यांनी अनुभवले होते. काँग्रेसमध्ये मात्र त्यांच्या मितभाषी, पण ठाम स्वभावाला, नेतृत्वगुणांना वाव मिळत होता.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लालबहादूर यांना उत्तर प्रदेशातील गोविंद वल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि प्रगत विचारांच्या शास्त्रीजींनी बसमध्ये महिला कंडक्टर नेमण्याची प्रथा सुरू केली. 1951 मध्ये शास्त्रीजी अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव झाले. उत्तर प्रदेशातील फुलपूर मतदारसंघातून 69 टक्के मतं मिळवून ते देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (1952) आमदार झाले. मात्र नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलावून रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. या पाच वर्षांच्या कारकीर्दीत एका मोठय़ा रेल्वे अपघातानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. देशातलं हे अद्वितीय उदाहरण म्हणावं लागेल. कालांतराने देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. पंडित नेहरूंच्या निधनानंतर ते पंतप्रधान झाले. या काळातही त्यांची साधी राहणी तशीच होती. सरकारी वाहन न वापरता आपल्या मामांना रेल्वे स्टेशनवर सोडायला जाणारे, बँकेतून कर्ज काढून मोटार खरेदी करणारे, देशातील लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागते म्हणून आठवडय़ातून एक दिवस उपास करणारे शास्त्रीजी अल्पावधीतच लोकप्रिय झाले. देशातील हरित क्रांतीसाठी अण्णासाहेब शिंदे आणि कुरियन यांच्या सारख्यांना त्यांनी सक्रिय प्रोत्साहन दिलं. त्याची चांगली फळं नंतर मिळाली. ‘जय जवान, जय किसान’ ही त्यांची घोषणा देशात दुमदुमली.

आर्थिक संकटं, अन्नधान्याची टंचाई आणि 1962 चा पराभव यातून सावरत असतानाच सप्टेंबर 1965 मध्ये पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करण्याचं दुःसाहस केलं. शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या सैन्याने हे आक्रमण परतवून लावलंच, पण आपली सेना लाहोरपर्यंत जाऊन पोहोचली. सबंध देशात एक प्रकारचं चैतन्य पसरलं. 23 सप्टेंबरला पाकिस्तान पुरता गळपटला आणि युद्ध थांबलं. त्यानंतर जानेवारी 1966 मध्ये रशियातील (आताच्या उझबेकिस्तानातील) ताश्कंद येथे हिंदुस्थान-पाक शांतता करारासाठी गेले असताना देशाचे लाडके पंतप्रधान आकस्मिकरीत्या कालवश झाले. देशाला हा फारच मोठा धक्का होता. कष्ट, सचोटी आणि त्यागमूर्ती असलेले शास्त्रीजी आता नव्हते. त्यांची ‘जय जवान, जय किसान’ घोषणा मात्र त्यांना अमर करणारी ठरली.

आपली प्रतिक्रिया द्या