स्वयंपूर्ण मंगळ?

khagoldilip@gmail.com

पृथ्वीवर गडगंज पाणी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे पंचाहत्तर टक्के तर समुद्र आहे. या अफाट जलनिधीतून उन्हाळय़ात वाफ झालेलं पाणी जमिनीवर पावसाच्या रूपाने पडतं. तसं ‘गोड’ पाणी उपलब्ध असण्याची एकूण टक्केवारी फारच कमी म्हणजे पृथ्वीवरच्या एकूण पाण्याच्या दीड ते दोन टक्के आहे. यातच पृथ्वीवरच्या सगळय़ा नद्या, तलाव, विहिरी वगैरेंचा समावेश होतो. पृथ्वीवरचं ९५ टक्क्यांहून जास्त गोड पाणी दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवरच्या हिमखंडांमध्ये साठवलेले आहे. हिमालय, आल्पस् अशा हिमपर्वतांमध्येही गोड पाण्याचेच बर्फ आहे, पण ते वितळून नद्यांमध्ये वाहतं होईपर्यंत त्याचा उपयोग होत नाही.

पृथ्वीवरचं वाढतं प्रदूषण, तापमान यामुळे ध्रुवीय हिमखंडांची कशी वाट लागतेय त्याच्या बातम्या सत्य असल्या तरी त्या… आणि मुंबईसारख्या शहराएवढे हिमखंड दक्षिण ध्रुवावरच्या अंटार्क्टिका खंडातून तुटून बाहेर पडत असले तरी आपल्या माध्यमांना ही उत्पाती असलेली अक्षरशः ‘ब्रेकिंग न्यूज’ एक तर महत्त्वाची वाटत नाही किंवा त्यामागचं गांभीर्य जाणवत नाही. असे धुवीय प्रदेशातले हिमखंड तुटत राहिले किंवा हिमालयातले ‘ग्लेशिअर्स’ विलग होऊ लागले तर गोठलेल्या स्वरूपात असलेलं गोड पाणी नष्ट होऊन खऱ्या समुद्राची पातळी काही मीटरनी वाढेल. त्यातून किनारपट्टीवरची जगभरातली गावं आणि शहरं हळूहळू जलमय होतील. पृथ्वीवरच्या हिमखंडांची अशी धास्ती वाटणारी स्थिती असताना तिकडे मंगळावरच्या हिमखंडांचा शोध मात्र तिकडे जाऊ पाहणाऱ्यांसाठी खूशखबर ठरत आहे. मंगळपृष्ठाखाली पाणी असेल याचा अंदाज संशोधकांना पूर्वीच आलाय, पण जानेवारी महिन्यात त्याबाबतचा ठोस पुरावा आढळल्याचं संशोधक म्हणतायत.

अमेरिकेतील ‘ऑरिझोना ल्युनार आणि प्लॅनेटरी ऑब्झव्हॅटरी’च्या संशोधकांना मंगळ पृष्ठाखाली दडलेल्या हिमखंडांचा शोध लागलाय. मंगळावर किमान आठ जागा अशा आहेत की, जेथे सुमारे शंभर-सव्वाशे मीटर खणल्यावर बर्फच बर्फ आढळणार आहे. म्हणजे मंगळावर जाणाऱ्यांच्या स्वप्नातील एक गोष्ट तरी साध्य झाली म्हणायची. पाण्याचा स्रोत म्हणजे ‘एचटूओ’ अर्थातच हायड्रोजन – ऑक्सिजनचं पाणी हे संयुग आहे. मंगळावरच्या बर्फात दडलेलं पाणी तहान तर भागवेलच, पण ते विपुल प्रमाणात असलं तर त्याचं विघटन करून हायड्रोजन-ऑक्सिजन अलग करून श्वसनासाठी ऑक्सिजन आणि इंधनासाठी हायड्रोजनचा उपयोग तिथल्या तिथे करता येऊ शकतो. हे नजीकच्या भविष्यकाळात शक्य झालं तर मंगळावरची संभाव्य वसाहत स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करील. हवा-पाणी या माणसाच्या मूलभूत गरजा. त्या पूर्ण झाल्या की तो वनस्पती, अन्न याची निर्मिती तेथेच करू लागेल. एलॉन मस्क नावाचा महत्त्वाकांक्षी उद्योजक अवकाश भरारीची आणि परग्रहावरच्या वस्तीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी किती अथक प्रयत्न करतोय हे याच स्तंभातून आपण जाणून घेतलंय. त्यामुळे चंद्र-मंगळावरच्या वसाहती या यापुढे केवळ गप्पा न राहता त्याला निश्चित स्वरूप येणार आहे. त्या दृष्टीने मंगळावरचं हे जल-संशोधन खूपच दिलासा देणारं आहे. माणसाच्या जगाची एक गंमतच आहे. एका बाजूला पार पाच-सात कोटी किलोमीटर अंतरावरच्या मंगळावर जाऊन बसण्याचा ध्यास प्रत्यक्षात आणण्यासाठी संशोधन करायचं आणि पृथ्वी नावाच्या फुकट मिळालेल्या संपन्न ग्रहाकडे, त्यावरच्या माणसांकडे, जीवसृष्टीकडे दुर्लक्ष करायचं! कदाचित पृथ्वीसारखं वसतीस्थान आपल्याला ‘फुकट’ मिळालंय म्हणून त्याची किंमत वाटत नसेल, पण एक वेळ अशी येईल की, प्रदूषणाच्या विळख्यातून आपलाच ग्रह वाचवण्याची वेळ निघून गेलेली असेल.

…आणि सात अब्ज माणसं नि लक्षावधी जैविक प्रजाती, वनस्पती थोडय़ाच चंद्र-मंगळावर नेता येणार आहेत!