कलाकाराला कायम असुरक्षित वाटले पाहिजे – दिलीप प्रभावळकर

30

सामना प्रतिनिधी । पुणे

अभिनय क्षेत्रामध्ये काही वर्षे घालवल्यानंतर आपल्याला सर्व काही येते, असा भाव येता कामा नये. कलाकाराने कायम आपण साकारत असणारी भूमिका आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद याबद्दल असुरक्षित असलं पाहिजे, तर अधिक चांगलं काम होतं, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग, आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित ८व्या आशियाई चित्रपट महोत्सवात दिलीप प्रभावळकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे जतन अधिकारी किरण धिवार, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सुप्रिया चित्राव आदी यावेळी उपस्थित होते.

दिलीप प्रभावळकर म्हणाले, ‘मी कोणत्याही भूमिका निवडल्या नाहीत, दिग्दर्शकांनी मला त्यामध्ये पाहिलं. अभिनेता म्हणून केवळ भूमिकांमध्ये वैविध्य राखण्याचं काम मी केलं. नवीन दिग्दर्शकांमुळे नवीन कल्पना शिकायला मिळतात, त्यामुळे अभिनेता म्हणून मी आजही काम करू शकत आहे’.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, ‘नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये दिलीप प्रभावळकर यांच्या इतक्या विविध भूमिका देशात कोणत्याही अभिनेत्याने केल्या नाहीत. अभिनेत्यांसाठी ते आदर्श आहेत’. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार वितरण समारंभानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘कासव’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या