दिलीप वेंगसरकर ‘हॉल ऑफ फेम’मध्ये! अमेरिकन इन्स्टिटय़ूटकडून सलाम

667

हिंदुस्थानसाठी 100पेक्षा जास्त कसोटी खेळणारे… 17 कसोटी शतके झळकावणारे… लॉर्डस् या क्रिकेटच्या पंढरीत सलग तीन शतके फटकावणारे… ही स्टोरी हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर या महान क्रिकेटपटूची. यावेळी मुंबईकर दिलीप वेंगसरकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेशी सलंग्न असलेल्या इन्स्टिटय़ूटने त्यांची ‘हॉल ऑफ फेम’साठी निवड केली आहे. येत्या तीन ऑक्टोबरला या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

याप्रसंगी या इन्स्टिटय़ूटचे महत्त्वाचे सदस्य असलेले पी.के. गुहा म्हणाले, दिलीप वेंगसरकर यांनी हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. लॉर्डस् या क्रिकेटच्या पंढरीत सलग तीन शतके झळकावण्याची किमया सर डॉन ब्रॅडमन यांनाही करता आली नाही. दिलीप वेंगसरकर यांच्या बॅटमधून सलग तीन शतके झळकावली गेली. त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत.

पी.के. गुहा पुढे म्हणाले, सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड यांच्या नावांची शिफारस कोणीही केली नाही. त्यामुळे त्यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान देण्यात आलेले नाही. तसेच कपिल देव यांची निवड झाली होती, पण त्यांना सोहळ्याला येता येणार नाही. त्यामुळे त्यांचे नावही वगळण्यात आले. कारण निवड झालेल्या व्यक्तीला सोहळ्याला हजर राहणे अनिवार्य आहे.

लॉर्डस्, अमेरिका झाले आता  एमसीएकडून केव्हा होणार गौरव?

दिलीप वेंगसरकर यांच्या कामगिरीला चहूबाजूंनी सलाम ठोकण्यात आलाय. लॉर्डस् स्टेडियमच्या कॉर्पोरेट बॉक्सला त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच अमेरिकन इन्स्टिटय़ूटकडूनही त्यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आलाय. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) त्यांना अद्याप म्हणावा तसा सन्मान मिळालेला नाही. वानखेडे स्टेडियममधील एका तरी स्टॅण्डला त्यांचे नाव द्यायला हरकत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या