पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची बनावट तिकिटे विकल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा कॉन्सर्ट दिलजीतच्या ‘दिल-लुमिनाटी टूर’चा एक भाग असून तो 26 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. दिल्ली पोलिसांनी महिनाभरापूर्वी गायकाच्या चाहत्यांना पोस्ट शेअर करुन सावधगिरीचा इशारा दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीने 69 तिकिटांची विक्री केली होती. ज्यातून त्याने 4 लाख 76 हजार 870 रुपयांची कमाई केली होती. आरोपीने त्या पैशातून आयफोन आणि ॲपल वॉच खरेदी केले होते. आरोपीने दिल्ली पोलिसांना सांगितले की, त्याने बनावट तिकिटे विकून तिघांची फसवणूक केली आणि त्याच्याकडून 6.75 लाख रुपये घेतले. यानंतर तो बंगळुरू आणि गोव्याला गेला, तिथे त्याने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि क्लबमध्ये पैसे खर्च केले.
दिलजीतच्या कॉन्सर्टची घोषणा होताच, सर्व तिकिटे बुक झाली आणि चाहते निराश झाले. काही लोक ऑनलाइन तिकिटे चढ्या दराने विकत असल्याचे दिल्ली पोलिसांना आढळून आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्व तिकीटे फुल झाली असून आता ब्लॅकने तिकीटविक्रीच्या नावाखाली चाहत्यांची फसवणूक होऊ शकते, असा इशारा दिला होता.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकीटांची विक्री करत होता आणि त्यांची किंमत 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत होती.