दिंडोशी विधानसभेतील रखडलेले प्रश्न तत्काळ मार्गी लावा!

रखडलेली रस्त्यांची कामे, आरोग्य केंद्र, अपुरा पाणीपुरवठा अशा दिंडोशी विधानसभेतील विविध समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार सुनील प्रभू यांनी नुकतीच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत पाठपुरावा केला. तसेच रखडलेले प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.

संस्कार कॉलेज येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याच्या विकासाने बाधित घरांचे पुनर्वसन कुरारमध्ये सुरू असलेल्या एसआरएमध्ये करावे याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱयांना देण्याची व हा रस्ता लवकर विकसित करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी सूचना सुनील प्रभू यांनी केली. कांदिवली लोखंडवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत, परंतु प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही याकडे त्यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सर्वच आठ प्रभागांमध्ये अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात जास्त दाबाने आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना आयुक्तांमार्फत देण्याची विनंती केली.

आमदार सुनील प्रभू यांचा महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा, उद्यानाचे सौंदर्यीकरण करा

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे उद्यानात नवीन माती टाकावी, मैदानाला पुंपण बसवावे तसेच मैदानाच्या सौदर्यीकरणाबाबत चर्चा केली.

दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवा  

जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, कांदिवलीचे शताब्दी रुग्णालय, मालाड येथील एस. के. पाटील रुग्णालय, गोविंद नगरचे म. वा. देसाई रुग्णालय, अप्पा पाडा येथील आरोग्य खात्याचे चिकित्सा पेंद्र येथील अपुऱया आरोग्य व्यवस्थेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करावी.