दिनेश कार्तिकने नेतृत्वपद सोडले, कोलकात्याला मिळाला वर्ल्ड कप विजेता कर्णधार मॉर्गन

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आयपीएलमधील लढतीआधी कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठा बदल घडून आला. दिनेश कार्तिक याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्वपद सोडले. आयपीएलचा अर्धा मोसम संपला असून आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सने चार लढतींमध्ये विजय मिळवला आहे. आता उर्वरित मोसमातील लढतींसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद वर्ल्ड कप विजेता कर्णधार ओएन मॉर्गनकडे सोपवण्यात आले आहे.

फलंदाजीवर होतोय परिणाम
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने चार लढतींमध्ये विजय मिळवले असून तीन लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. दिनेश कार्तिकलाही या कालावधीत अपयशाचा चेहरा पहावा लागला आहे. सात सामन्यांमधून त्याला फक्त 108 धावाच करता आल्या आहेत. यामध्ये एक अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. कर्णधारपद व फलंदाजी अशी दुहेरी जबाबदारी पेलण्यात दिनेश कार्तिक अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याने नेतृत्वपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. पुढील लढतींमध्ये त्याला फलंदाजीवर ध्यान देता येणार आहे.

18 चेंडूंत 44 धावांची खेळी ठरली महत्त्वाची
दिल्ली पॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामधील लढतीदरम्यान दिनेश कार्तिकच्या संघाला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. दिल्ली पॅपिटल्सकडून मिळालेल्या 229 धावांचा पाठलाग करणाऱया कोलकाता नाईट रायडर्सने 210 धावा फटकावल्या. या लढतीत ओएन मॉर्गनने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अवघ्या 18 चेंडूंत 44 धावांची खेळी साकारत कोलकाता नाईट रायडर्सला विजयाची स्वप्ने दाखवली, पण थोडक्यासाठी त्यांचा पराभव झाला. यावेळी ओएन मॉर्गनला सहाव्या क्रमांकावर पाठवण्याच्या दिनेश कार्तिकच्या निर्णयावर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या