‘केकेआर’ची धुरा दिनेश कार्तिकच्या खांद्यावर

51

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएलच्या ११व्या सत्रात गौतम गंभीरला घरच्या संघाचे म्हणजेच दिल्ली डेअरडेविल्सचे नेतृत्व करण्यास पाचारण करण्यात आल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सच्या नेतृत्वाची धुरा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. लढवय्या गंभीरच्या अनुपस्थितीत कोण, हा मोठा प्रश्न केकेआरसमोर उभा राहिला होता, मात्र संघव्यवस्थापनाने कार्तिकच्या पारड्यात मत टाकून याचे उत्तर शोधले आहे.

अकराव्या सत्रासाठी केकेआरने दिनेश कार्तिकसाठी तब्बल ७.४ कोटी रुपये मोजले आहे. कर्णधारपदासाठी रॉबिन उत्थप्पा हासुद्धा शर्यतीमध्ये होता. मात्र कार्तिकने अखेर बाजी मारली. तर उत्थप्पावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत आयपीएलमधला अनुभव आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव पाहता आम्ही दिनेशकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे संघव्यवस्थापनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्ट केले आहे. गेल्या आयपीएलच्या सत्रात गुजरात संघाकडून खेळताना कार्तिकने ३६.१ च्या सरासरीने ३६१ धावा फटकावल्या होत्या.

व्यंकटेश प्रसाद देणार किंग्ज इलेव्हन पंजाबला गोलंदाजीचे धडे
हिंदुस्थानचा माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आता किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांना गोलंदाजीची धडे देणार आहे. त्याची पंजाब संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे . नुकताच प्रसादने बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील निवड समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. व्यंकटेश प्रसादव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ब्रॅड हॉज आगामी तीन वर्षांसाठी किंग्ज पंजाबचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. व्यंकटेश प्रसादच्या येण्याने किंग्ज इलेव्हन पंजाबमधील खेळाडूंना फायदा होणार असल्याचे मत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या