‘एकनाथ’चे संचालक मंडळ बरखास्त

44

सामना प्रतिनिधी । पैठण

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संपूर्ण संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले आहे. अनियमिततेचा ठपका ठेवत कारखान्यावर प्रशासक नेमण्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे चेअरमन असलेल्या या कारखान्याचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे. दरम्यान, या निर्णयाविरुद्ध राज्य सहकारमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे शिसोदे यांनी म्हटले आहे.

राम कोंडीराम एरंडे व विक्रम घायाळ या संचालकांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. या वृताने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संचालक मंडळाने हा कारखाना नाशिक येथील शिला अतुल शुगरटेक या कंपनीला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला आहे. यंदा कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला असून, सुमारे अडीच लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कंपनीला कारखाना देण्याचा व्यवहार नियमबाह्य पद्धतीने करून संचालक मंडळाने संस्थेने नुकसान केले, अशी तक्रार एरंडे व घायाळ यांनी सहकारी संस्था सहनिबंधकांकडे केली होती. त्याची दखल घेत निलिमा गायकवाड (सहनिबंधक सहकारी संस्था तथा सहसंचालक साखर (प्रादेशिक विभाग संभाजीनगर) यांनी चौकशीअंती कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. दि.२१ एप्रिल रोजी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

प्रथम विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था संभाजीनगर विलास सोनटक्के यांची कारखान्यावर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बरखास्त संचालक मंडळातभाजप तालुकाध्यक्ष तथा चेअरमन तुषार शिसोदे, व्हाइस चेअरमन भास्कर राऊत, संचालक अप्पासाहेब रामकृष्ण बाबा पाटील, माजी आमदार संजय वाघचौरे, हरिभाऊ मापारी, आबासाहेब मोरे, ज्ञानेश औटे, आसाराम शिंदे, प्रल्हाद औटे, गोपीकिशन गोर्डे, दत्तात्रय आमले, अक्षय शिसोदे, कचरु बोबडे, मुक्ताबाई बोरडे, अहिल्याबाई झारगड, शिवाजी घोडके, विजय गोरे, अण्णासाहेब कोल्हे, प्रकाश क्षीरसागर यांचा समावेश आहे.

  • संचालक मंडळावरील ठपका
  • संस्थेच्या हिताविरुद्ध कृत्य करणे. वैधानिक कार्य पार न पाडणे.
  • गंभीर वित्तीय अर्थिक नियमबाह्य कामे केल्याने संस्थेचे अर्थिक नुकसान झाले.
  • बेकायदेशीर कृत्य केल्याने संस्थेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता.
  • अनियमततेमुळे घडलेल्या घटना अर्थिक नुकसानीच्या ठरल्या असून, संस्थेची हानी झाली आहे.

साडेनउ कोटींचा दंड, आता दुसरा दणका
आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत राज्य साखर आयुक्त कार्यालयाने तीन महिन्यांपूर्वीच कारखान्याला ९ कोटी ४ लाख १० हजारांचा दंड ठोठावला होता. निलंबित संचालक घायाळ व एरंडे यांच्या तक्रारीवरूनच ही कारवाई झाली होती. त्यापाठोपाठ आता कारखान्याला हा दुसरा दणका आहे.

आदेशाविरोधात दाद मागणार : चेअरमन
संचालक मंडळ बरखास्तीच्या या आदेशाविरोधात आम्ही राज्याच्या सहकारमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत, असे कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी स्पष्ट केले. ऊसबिलापोटी बाकी असलेली शेतकऱ्यांची देणी चुकती केली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. उस उत्पादकांनी विश्वास टाकून आम्हाला निवडून दिले होते. संस्था व शेतकऱ्यांचे हित पाहून कारखा चालू करणे गरजेचे होते. शिला अतुल शुगरटेकच्या सहकार्याने तो चालू केला. यंदाच्या गळीत हंगामात चांगले साखर उत्पादनही घेतले, असेही शिसोदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या