लखलखता आणि ‘शिस्तबद्ध’ लाँग मार्च

21

सामना ऑनलाईन । मुंबई

शांततेने सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी शिस्तही पाळली. पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांच्या पुड्यांची आवरणे ते पालिकेने पुरवलेल्या कचरापेटीत टाकत होते. पालिकेनेही खाण्यापिण्याच्या आणि इतरही ठिकाणी कचरापेट्या ठेवल्यामुळे कुठेही अस्वच्छता झाली नाही.

खोक्याची बनवली छत्री
आंदोलनात वृद्ध शेतकरी आणि आदिवासी सहभागी झाले होते. त्यांच्या पायाला चालून जखमा झाल्या होत्या. तरीही त्यांनी उन्हाची पर्वा केली नाही. डोक्याला रुमाल गुंडाळून आणि खोक्याची छत्री करत त्यांनी उन्हापासून आपला बचाव केला.

शिवसेना मदतीला धावली
शिवसेनाही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावली. दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पाणी आणि बिस्कीट वाटप करण्यात आले. मोर्चाच्या मार्गावरही ठिकठिकाणी शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना वडा-पाव आणि पाणी वाटप केले.

परतीच्या प्रवासासाठी रेल्वे आणि एसटीच्या विशेष गाड्या

नाशिकहून आलेल्या हजारो शेतकरी बांधवांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेने आणि एसटी महामंडळाने विशेष गाडय़ांची सोय केली आहे. मध्य रेल्वेने रात्री ८.५० वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी ते भुसावळ ट्रेनमध्ये १३ अनारक्षित कोचची सोय केली. त्यानंतर दुसरी सीएसएमटी ते भुसावळ ट्रेन रात्री १० वाजता सोडण्यात आली. तसेच पंचवटी एक्प्रेस,दादर-शिर्डी ट्रेनला आणि हावडा मेललादेखील एक अतिरिक्त कोच जोडण्यात आला होता.

एसटी महामंडळाने आझाद मैदानात १५ बसेसची सोय केली होती. त्यापैकी दोन बसेस शेतकऱ्यांनी आरक्षित केलेल्या होत्या. तसेच बरेच जण लोकलने कसारा गाठून तेथून पुढील प्रवास करीत असल्याने महामंडळाने कसारा स्थानकाजवळ जादा पंधरा बसेसची सोय केली.

जखमांवर मायेची फुंकर

शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा आझाद मैदानात पोहोचला तेव्हा शेकडो कॅमेरे त्यांच्यावर खिळले. आझाद मैदानात त्यांनी ठाण मांडले. शेतकऱ्यांसाठी अवघी मुंबई धावली. त्यांच्यासाठी भाजी-भाकरी घेऊन अनेक संस्था, संघटनांचे कार्यकर्ते आझाद मैदानावर पोहोचले. चपात्या, तांदळाच्या भाकऱ्यांचा ढीग पडला. मग शेतकऱ्यांनी मैदानावरच चार घास पोटात घातले. चालून-चालून पायाला भेगा पडलेल्या शेतकऱ्यांसाठी स्लीपर वाटल्या गेल्या. शीणलेल्या शरीराला आराम मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी चपलांची उशी करून मैदानावरच क्षणभर विश्रांती घेतली.

बळीराजासाठी डबेवाल्यांनी पुरवले जेवण
लाखो मुंबईकरांना रोज वेळेवर जेवण पोहचविणारे डबेवाले शेतकऱ्यांसाठी आज जेवण घेऊन धावले. दादर ते कुलाबा या परिसरात काम करणाऱ्या डबेवाल्यांनी मुंबईकरांकडून जेवण गोळा करून ते आझाद मैदानात शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविले.

आपली प्रतिक्रिया द्या