२९/८ प्रश्न आणि उत्तरं

45

डॉ. उमेश मुंडल्ये

२९ ऑगस्ट रोजी मुंबईत उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे अवलोकन करताना समोर आलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं मांडणारा लेख.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर निसर्गाचा कोप, ढगफुटी, भरती आणि त्यामुळे आलेला फुगवटा वगैरे गोष्टींवर सोशाल मीडियावर खूप पोस्ट आणि कॉमेंट्स आल्या. कित्येकांनी वैयक्तिक, राजकीय विरोध दाखवण्याचं साधन म्हणून याचा उपयोग केला. हे केवळ यापुरतेच न घेता याबद्दल नीट विचार करणे गरजेचे आहे.

मुंबईमध्ये झालेला २९ ऑगस्ट रोजीचा पाऊस आणि पूरपरिस्थिती, यात दोन-तीन मुख्य मुद्दे आहेत. मुंबई आणि परिसरात दरवर्षी, म्हणजे साधारण १०० दिवसांत २२०० मिमी पाऊस पडतो. पण तो सगळे दिवस सारखा पडत नाही. सुमारे ८०टक्के पाऊस २० दिवसांत आणि २०टक्के पाऊस ८० दिवसांत अशी साधारण विभागणी असते. त्यामुळे उपाययोजना करताना हे लक्षात घेऊन काम केलं तर नक्की फायदा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचं भौगोलिक स्थान, त्यात ब्रिटिशांनी केलेले आणि नंतर आपण केलेले व अजूनही करत असलेले बदल. अर्थात, ब्रिटिशांनी केलेले बदल आणि आपण गेली काही वर्षं चालवलेले बदल यात एकूणच खूप गुणात्मक फरक आहे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत येणारे लोंढे आणि त्यामुळे होणारी अनियंत्रित लोकसंख्या वाढ. त्यातच भर म्हणून झालेली अनियमित, अवास्तव आणि अनधिकृत ‘विकास’ नावाची भयकारी गोष्ट याचा विचारही व्हायला हवा.

सामान्य जनता, प्रशासन, राजकीय व्यवस्था इथपर्यंतच हे मर्यादित नाही तर निसर्ग, पाणी, पर्यावरण याबद्दल असलेली अनास्था, अनभिज्ञता, बेफिकिरी यासाठी कारणीभूत आहे. तसेच नियम न पाळण्याची तथाकथित ‘व्हीआयपी’ समजली जाणारी, स्वतःला कायद्याच्या वर मानणारी प्रवृत्ती याही गोष्टी यासाठी मारक आहेत. वरील सर्व गोष्टींचा विचार करून एक नक्की सांगता येईल की, असे प्रसंग येऊ नयेत किंवा आले तर त्यावर उपाय करून त्रास कमी कसा करता येईल यासाठी विषय पूर्ण समजून घेऊन काही गोष्टी नक्की करता येतील.

मुंबईत २९ ऑगस्ट रोजी पडलेला पाऊस हा वार्षिक सरासरी पावसाच्या साधारण १०टक्के होता. त्यामुळे पाणी खूप येणार हे ओघानं आलंच. त्यात भरती होती, त्यामुळे फुगवटा होणार हेही आलंच. आपण सगळेच, म्हणजे नागरिक, प्रशासन, राजकीय क्षेत्र, समाजाचे सर्व घटक ही आधीच अवघड असलेली परिस्थिती बिकट व्हायला जबाबदार आहोत. आपण दोषारोपात अडकण्यापेक्षा काय करता येईल ते पाहूया.

शहरात पाऊस पडतो तेव्हा पाणी इमारतीच्या छतावरून खाली येतं. ते पाइपमधून खाली असलेल्या (बहुसंख्य ठिकाणी) फरशी किंवा काँक्रीटवरून वाहून पालिकेच्या नाल्याला मिळतं. तिथून ते एकत्र होत जवळच्या ओढा, नाले, नदी, खाडी किंवा समुद्र यांना जाऊन मिळतं. पृष्ठभाग कोणता आहे यावर पाणी जिरेल की वाहील आणि किती जिरेल आणि किती वाहणार हे ठरतं. जर मोकळं मैदान किंवा माती असलेली जागा असेल तर पडणाऱ्या पाण्याच्या ५०टक्के जमिनीत मुरतं. पण काँक्रीट असेल तर जेमतेम १०टक्के पाणी नाही मुरत, सगळं वाहून जातं. पूर्वी इमारतीच्या आवारात माती असायची. खूप मैदानं आणि मोकळ्या जागा असायच्या. त्यामुळे पाणी आधी जमिनीत मुरायचं आणि मग आवाराबाहेर यायचं. त्यामुळे पाणी हळूहळू यायचं आणि नाले भरून वहायला वेळ लागायचा. आता माती कमी किंवा नाहीशी झाल्याने पाणी लगेच आणि पूर्णपणे नाल्यांत येतं आणि परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. हे सध्या शहरभर दिसून येते. त्यात अनधिकृत बांधकामं, रस्ते आणि फुटपाथ करताना, रस्ता दुभाजक करताना झालेलं दुर्लक्ष हेही आहे. याशिवाय यात इतर नागरी समस्याही भर घालतात आणि मग आताची परिस्थिती निर्माण होते.

याचं दुसरं टोक म्हणजे, पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडवायचा आणि जिरवायचा. लोकांचा हा गैरसमज का आहे हे कळत नाही. समुद्रात पाणी वाया जाऊ द्यायचं नाही म्हणे. आपण कायम कुठल्याही गोष्टीत टोक का गाठतो कोण जाणे. जलचक्र नावाची एक घटना आहे, त्यात फेरफार झाले तर खूप नुकसान होऊ शकतं हे आपल्याला अनुभव येऊनही पटत नाही. एकीकडे आपण आपल्या कृतीने पृथ्वीचं तापमान वाढवतोय आणि दुसरीकडे, ज्या पाण्यामुळे व समुद्रामुळे पृथ्वी थंड राहायला मदत होते त्या समुद्रात पाणी ‘वाया’ जाऊ न देण्याबाबत बोलतो. जर पुरेसं गोडं पाणी समुद्रात गेलं नाही तर काय होतं ते मृत समुद्राबद्दल माहिती घेतल्यावर कळेल.

थोडक्यात कृतीची दिशा सांगायची तर, जिथे शक्य असेल तिथे विहीर, बोरवेल, रिंगवेल यासारखे स्रोत असतील ते वापरा आणि नवीन तयार करा आणि त्याचं योग्य पद्धतीने पुनर्भरण करा. जर इमारतीच्या आवारात माती असेल तर किंवा उताराच्या कोपऱयात एक तरी शोषखड्डा (recharge pit) बांधून काढा आणि छतावरील पावसाचं पाणी तिकडे वळवा. तिथून ओवरफ्लो पालिकेच्या नाल्यात सोडा. आपण जिथे आहोत तिथली भौगोलिक परिस्थिती जाणकार व्यक्तीकडून जाणून घ्या (geology & topography), माती किती आहे, उतार कसे आणि कुठे आहेत, रस्ता कुठे आहे, विहीर योग्य की बोरवेल, आपल्याला पाणी फक्त जिरवायचं आहे की परत वापरायचं आहे, इत्यादी गोष्टींचा विचार करून अनुभवी तज्ञ व्यक्तींच्या मदतीने उपाययोजना अंमलात आण.

फक्त बोरवेल करणं किंवा आलेलं सगळं पाणी त्यात टाकणं हा काही उपाय नाही. आपण समुद्राजवळ आणि साधारण त्याच पातळीवर आहोत, त्यामुळे कोणतेही उपाय केले तरी वर्षातून एकदा पाणी काही काळ तरी साचणार हे लक्षात घ्या. आपण करत असलेले उपाय हे पाणी लगेच वाहून जाऊ नये म्हणून आहेत, आपल्याला दिसलं नाही तरी पाणी उताराने जात राहणार समुद्राकडे, हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ‘प्लास्टिक’चा वापर पूर्णपणे टाळायचा प्रयत्न करा. आपली ७०टक्के समस्या प्लास्टिकच्या विल्हेवाट करताना होणाऱ्या गैरव्यवस्थापनामुळे आहे हे पक्कं लक्षात ठेवा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या