दिशाबाबत अफवा पसरविल्याप्रकरणी वडिलांनी अभिनेत्याविरोधात पोलिसांत केली तक्रार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तिच्याबाबत बदनामीकारक अफवा पसरविल्याप्रकरणी दिशाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी अभिनेता पुनीत वशिष्ठ, संदीप मलान आणि नमन शर्मा यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दिशाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दिशाने 9 ऑगस्ट रोजी ती राहत असलेल्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर दिशाचे नाव हे अभिनेता सुरज पंचोलीशी जोडले गेले. दिशा व सुरज पंचोलीचे संबंध होते व त्यातून ती गरोदर राहिली होती अशी देखील अफवा सोशल मीडियावर पसरली होती. तसेच दिशाचा मृतदेह पोलिसांना नग्नअवस्थेत आढळल्याची देखील अफवा पसरली होती. मात्र मुंबई पोलिसांनी दिशा नग्नावस्थेत आढळली नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी सतीश सालियन यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्य़ाचे समजते. दिशाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिचे पालक, तिचा होणारा नवरा रोहन रॉय, तिच्यासोबत आदल्या रात्री पार्टी करणारे मित्र मैत्रीणी व तिच्या बिल्डिंगमधील सुरक्षा रक्षक यांची चौकशी केली आहे.

दिशा व सुरजच्या संबंधाच्या अफवेवर सुरजने देखील काही दिवसांपूर्वी मौन सोडले होते. ‘मी दिशाला ओळखत देखील नाही. मला व माझ्या कुटुंबाला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर मला दिशा सालियनविषयी समजले. मी आयुष्यात कधीच तिला भेटलो नाही’, असे सुरजने सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या