बंगालमधील भाजप नेते वैतागले, दिल्लीतून पाठबळ मिळत नसल्याची केली तक्रार

बंगालमधील भाजप नेते पक्षाच्या वरिष्ठांवर नाराज झाले आहेत. तृणमूल काँग्रेसशी संघर्ष करत असताना दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याने ही नाराजी निर्माण झाली आहे. नेत्यांसोबतच बंगालमधील भाजप कार्यकर्ते देखील हिरमुसले आहेत. रविवारी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बंगालमधील नाराजीबद्दल विशेष चर्चा करण्यात आली.

रविवार पार पडलेल्या बैठकीमध्ये ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यांच्याबद्दल चर्चा होणार होती. मात्र या चर्चेशिवाय बंगालमधील परिस्थितीवरही विशेषार्थाने चर्चा करण्यात आली. बंगालबद्दलचा विषय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणातही ऐकायला मिळाला आणि पक्षाच्या प्रस्तावामध्येही बंगालबद्दलच्या समावेश होता. जनसत्ताने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय की भाजपच्या एका नेत्याने, दिल्लीत बसलेले नेते बंगालमधील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांना विशेष सहकार्य करत नसल्याचे सांगितले आहे. खासकरून तृणमूल काँग्रेसविरोधातील लढाईत आपल्याला साथ मिळत नसल्याची बंगाल भाजप नेत्यांची तक्रार आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर चिटफंड घोटाळ्याचे आरोप आहेत. या प्रकरणी पुरावे असूनही केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्याविरोधात कारवाई का करत नाही असा प्रश्न बंगालमधील भाजप नेत्यांनी विचारला आहे. याउलट ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील भाजप नेत्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना कारवाईबाबत विचारण्यात आल्यावर ‘योग्य वेळ येईल तेव्हा करू’ असं उत्तर दिलं जातं. मात्र ती वेळ केव्हा येणार हे या नेत्यांना कळत नाहीये. बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही. यानंतर तिथल्या भाजप नेत्यांनी पक्ष सोडून आपल्या मूळ पक्षात जायला सुरुवात केली. या निवडणुकीच्या निमित्ताने जी बांधणी करण्यात आली होती, ती यापुढे वाढवत नेणं गरजेचं आहे. त्यासाठीही आपल्याला योग्य ते पाठबळ मिळत नसल्याची बंगाल भाजप नेत्यांची तक्रार आहे.