नगरमध्ये विखेंविरोधात भाजपमध्ये नाराजी; लोकसभेपूर्वी संघर्ष विकोपाला, निष्ठावंत वेगळी चूल मांडणार?

भाजपच्या जिल्हा निवडी झाल्यानंतर पक्षात अंतर्गत नाराजी पसरली होती. आता भाजपमध्येच विखेंविरोधात नाराजी वाढली असून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य ,माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी नगर दक्षिणचा दौरा अचानक सुरू केल्यामुळे भाजपमध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी विखेंविरोधात उघड नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वी अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याने भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे नगरच्या राजकारणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्याबाबत भाजपत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाजपमधील विखे विरोधातील संघर्ष अनेकदा टोकाला गेला आहे. त्यातच मागील महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डी या ठिकाणी झालेला कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर भाजपाचे आमदार राम शिंदे व मोनिका राजळे यांनी विखेंच्या या कार्यक्रमाबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. त्यातच या अगोदर मागील सहा महिन्यापूर्वी विखे विरोधामध्ये भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर एकत्र आले होते. ज्यांना पक्षातून डावलले जात आहे, त्यांनी आता एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्या बैठकीमध्ये विखेंच्या विरोधामध्ये तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. ती नाराजी दूर काढण्यासाठी विखेंना मोठे प्रयत्न करावे लागणार आहे.

भाजपांतर्गत कुरघोडी आजूनही सुरूच आहे. जिल्हाध्यक्ष निवडण्यापासून तर पदाधिकाऱ्यांच्या निवडीपर्यंत अनेक विषय आता चर्चेला येत आहेत. त्यामुळे अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्यांच्या निवडी झाल्या त्यांनी पदभार घेतला, पण दुसरीकडे ज्यांना पदे दिली नाहीत त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी ते दिसून येत आहे.

दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विखेंवर निशाणा साधण्याची संधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोडली नाही. आमदार राम शिंदे यांनी पारनेरचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांची भेट घेऊन दिवाळी फराळामध्ये त्यांनी एकमेकांना मिठाई भरवली आणि एकत्र असल्याचे दाखवून दिले. ज्या गणेश कारखान्यामध्ये विखेंना धुळ चारली अशा थोरात व कोल्हे गटातील अमित कोल्हे यांनी सुद्धा लंके यांच्या फराळाला जाऊन त्यांनी विखेंना एक प्रकारे शह देण्याची तयारी सुरू केली. भाजपमधूनच आता विखेंना शह देण्यासाठी आता निष्ठावंत कार्यकर्ते व आजी-माजी पदाधिकारी कामाला लागलेले आहे.

एकंदरीतच आता विखे विरोधातला संघर्ष हा भाजपमध्ये अधिक विकोपाला जाण्यास सुरुवात झाली आहे. माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारणी सदस्य भानुदास बेरड यांनी केल्या 15 दिवसापासून नगर दक्षिण मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यांनी नव्या जुन्या आजी माजी पदाधिकारी यांच्या थेट गाठीभेटी सुद्धा सुरू केल्या, जुन्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटणे व त्यांच्याशी चर्चा करणे व पक्षाचे काम कशा पद्धतीने पुढे न्यायचे यावर चर्चा करणे आधी विषय घेऊन एक प्रकारे त्यांनी आता विखेंना शह देण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे भाजप अंतर्गतला आता हा कलह आगामी काळामध्ये वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे मोट बांधण्यास सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागेल त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपमध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत हेच यावरून दिसून येत आहे.