Nagar News – खून्नसने पाहण्याच्या कारणातून सक्कर चौक परिसरात राजकीय राडा

खुन्नसने पाहण्याच्या कारणातून शिवसेनेचे (शिंदे गट) माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते आणि विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वादावादी झाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सर्वजण निघून गेले होते. ओंकार सातपुते याने विरोधकांना आव्हान देत या पुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला. सक्कर चौक परिसरात घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसात फिर्यादी देण्यात आली नाही.

ओंकार सातपुते हे आज दुपारी शहरातील यश पॅलेस चौकातून आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होते. सगम हॉटेलच्या परिसरात आमदार संग्राम जगताप यांचे कार्यालय आहे. काही कार्यकर्ते तेथे बाहेर उभे होते. यावेळी खुन्नसने पाहण्याच्या कारणातून काहीजणांनी सातपुतेंचा पाठलाग केला व सक्कर चौकात त्यांना गाठले. बघता बघता तीस-चाळीस कार्यकर्ते जमा झाले. यावेळी शाब्दिक बाचाबाची होऊन नंतर मारामारीही झाली. यात एक जण जखमी झाला आहे. नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवून गर्दीला पांगवले.

या घटनेनंतर दिलीप सातपुते व ओंकार सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत झालेला प्रकार सोयऱ्याधायऱ्यांच्या गुंडगिरीचा असल्याचे सांगितले. तसेच ओंकारला मारहाण झाल्याचे सोशल मीडियावर पसरलेले वृत्त चुकीचे असून, पुरावा पाहिजे असेल त्यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहावे, असेही सातपुते पिता-पुत्र म्हणाले.