जिल्हा बँका आणि सोसायट्यांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या

613

राज्यात महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी व्हावी, सहकार खात्याचे अधिकारी निवडणूक कामात अडकून पडू नयेत म्हणून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटय़ांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

राज्यातील 31पैकी 22 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 21 हजार 225 विविध कार्यकारी सोसायटय़ांपैकी आठ हजार 194 सोसायटय़ांच्या निवडणुका जानेवारी ते जून या कालावधीत होऊ घातल्या आहेत. मुदत संपण्यापूर्वी या निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत या निवडणुकांची तयारी सुरू केली.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱयांसाठी कर्जमुक्ती योजना घोषित केली असून मार्चनंतर शेतकऱयांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत सहकार खात्यातील अधिकारी व्यस्त राहणार असल्यामुळे, तसेच याच वेळी निवडणुका होणार असल्याने त्याचा परिणाम कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत होण्याची शक्यता आहे. तसेच कर्जमुक्ती योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱयांना खरीप हंगामामध्ये कर्ज घेण्यास पात्र करणे हा असल्याने हे काम वेळेत होणे महत्त्वाचे आहे. म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सोसायटय़ांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या. सहकार विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी हा आदेश जारी केला आहे.

  • ज्या बँका आणि सोसायटय़ांमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे अथवा या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होऊन उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू आहे अशा संस्था या देशातून वगळण्यात आल्या आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या