उद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे बँकांना आदेश

471

राजेश देशमाने । बुलढाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी इशारा मोर्चा काढून बँक व विमा कंपन्यांना 15 दिवसांची मुदत दिली होती. यामुळे राज्य प्रशासन खळबळून जागे झाले आहे. खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना पीक कर्जाच्या वाटपासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्यामुळे बुलढाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी 22 जुलै पासून शाखास्तरावर खरीप हंगाम संपेपर्यंत दररोज पीक कर्ज वाटपाचे मेळावे घेण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

मुंबई येथे 17 जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य इशारा मोर्चा निघाला होता. या मोर्चाला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या योजनांच्या मध्ये आडवे येणार्‍या बँक आणि विमा कंपन्यांनी 15 दिवसात शेतकर्‍यांना न्याय द्या अन्यथा 16 व्या दिवशी तुमच्या पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही असा सणसणीत इशारा दिला होता. याची गंभीर दखल राज्य शासनाने घेत सर्व जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेऊन लक्ष घालण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेल्या परिपत्रकात म्हटले की, सन 2019 चे खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी खातेदारांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटप मोहीम युध्द पातळीवर राबविण्यात येत आहे. मोहीमेअंतर्गत महसुल मंडळ निहाय कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून महसुल विभागाकडून प्रत्येक गावनिहाय कर्ज वाटप पालक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सर्व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखानिहाय सहकार विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या शाखा समन्वयक आणि तालुका संपर्क अधिकारी म्हणून नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. तसेच, जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सक्षम नसल्यामुळे या बँकेकडील कर्ज माफ झालेल्या पात्र केसीसी खातेदारांना इतर संलग्न राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वाटप करणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

वरीलप्रमाणे चालू हंगामातील पिक कर्ज वाटपाचा लक्षांक पुर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची प्रशासकीय कार्यवाही करून सुध्दा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत अद्यापही लाभ न मिळाल्याबाबत शेतकर्‍यांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत वरीष्ठ पातळीवरून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत असून जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविणेबाबत या कार्यालयास निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँक शाखांनी २२ जुलै रोजीपासून खरीप हंगाम संपेपर्यंत (30 सप्टेंबर पर्यंत) दररोज शाखा स्तरावर पीक कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन करून त्यामध्ये शाखेचे पात्र केसीसी खातेदारांचे पिक कर्ज नुतनीकरण, पुनर्गठन, नविन खातेदारांना पीक कर्ज वाटप तसेच कर्जमाफी योजनेसंदर्भातील तक्रारींचे निराकरण इत्यादी स्वरूपाचे कामकाज करावयाचे आहे. याकरीता प्रत्येक बँक शाखेने जबाबदार कृषि अधिकारी / क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करून मेळाव्याकरीता स्वतंत्र व्यवस्था करावी, जेणेकरून शेतकर्‍यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. बँकेचे अधिकारी यांनी वरीलप्रमाणे सहकार विभागाकडून नियुक्त करण्यात आलेले शाखा समन्वयक / संपर्क अधिकारी यांना सदर कामी आवश्यक ते सहकार्य करून त्यांचे सुध्दा सहकार्य प्राप्त करावे. तसेच, याबाबत शेतकर्‍यांकडून कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची सर्व बँकांनी दक्षता घेऊन चालू हंगामातील पीक कर्ज वाटपाचा अपेक्षित लक्षांक साध्य करावा. वरीलप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तसेच पीक कर्ज वाटपातील प्रगतीबाबतचा नियतकालिक अहवाल वेळोवेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक यांचे कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा. असे जिल्हाधिकारी डांगे यांनी आदेशात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या