पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिह्यातील अनेक दिंडय़ांसह परजिह्यातील दिंडय़ा नगर जिह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जातात. या दिंडय़ांतील वारकऱयांना पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
आषाढी वारीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जि.प. सीईओ आशिष येरेकर, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, मानाच्या पालख्यांचे प्रमुख तसेच जिह्यातील दिंडय़ांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, ‘श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिह्याबरोबरच परजिह्यातील अनेक दिंडय़ा नगर जिह्यातून जातात. या दिंडय़ांमधील वारकऱयांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. मुक्कामाची ठिकाणे ठरलेली आहेत. ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंडय़ा मुक्कामी थांबणार आहेत, तेथे सर्व सुविधा असाव्यात. वारकऱयांना मार्गावर शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या.’
हजारो वारकरी पायी चालत असतात. अशावेळी वारकऱयांचे आरोग्य चांगले राहील, यादृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसेच जागोजागी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात यावीत. रुग्णास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात याव्यात. प्रथमोपचार किट तयार करून ते प्रत्येक दिंडीमध्ये देण्यात यावी, अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या.
दिंडी मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱयांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंडीसोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. तसेच दिंडय़ा ज्या ठिकाणी मुक्कामी राहतील, तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत. जिह्यातील दिंडय़ा ज्या मार्गावरून जातात, त्या मार्गाची आवश्यकतेनुसार डागडुजी, खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला दिल्या.
मानाच्या पालखी प्रमुखांनी केला जिल्हाधिकाऱयांचा सत्कार
गतवर्षी आषाढी वारीमध्ये प्रशासनाने वारकऱयांना उत्कृष्ट सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, राजराजेश्वरी दिंडी प्रमुखांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा सत्कार केला. तसेच सर्व दिंडी प्रमुखांनी वारकऱयांचा विमा काढण्यात यावा. वाहनांना पासेसचे वितरण नगर येथून व्हावे, अशा मागण्या दिंडी प्रमुखांनी केल्या.