लेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता

>>दिवाकर शेजवळ  

अर्जुन डांगळे म्हणजे ‘पँथर’ आणि प्रख्यात दलित साहित्यिक. त्यांचा गेल्या पाच दशकांतील प्रवास हा दलित पँथर, भारिप-बहुजन महासंघ, रिपाइं असा झाला आहे. ‘महायुती’मध्ये रामदास आठवले हे भाजपकडे सरकल्यानंतरही डांगळे हे शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीच्या भूमिकेवर ठाम राहून शिवसेनेसोबत राहिले. वैचारिक आघाडीवर त्यांनी आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता अशीच भूमिका बजावली. राजकीय लाभाच्या बाबतीत तसे ते अजूनही वंचितच आहेत. मुळात रिपब्लिकन चळवळच ‘राजयोगा’च्या बाबतीत काही कारणांमुळे अभागी ठरलेली आहे. अर्थात या राजकीय अभावग्रस्ततेमुळे अशा प्रतिभासंपन्न नेत्यांची गुणवत्ता आणि चळवळीतील त्यांच्या योगदानाला उणेपण कदापिही येऊ शकत नाही. अर्जुन डांगळे आज हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त…

ही गोष्ट 1970 सालातील म्हणजे तब्बल पन्नास वर्षांपूर्वीची आहे. ‘प्रगत साहित्य सभा’ या संस्थेने त्या वेळी दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात भिवंडी दंगलीच्या मुद्यावर एक कवी संमेलन आयोजित केले होते. त्याचे अध्यक्ष होते नामवंत लेखक, साहित्यिक प्रा. अनंत काणेकर अन् त्यात सहभाग होता विं.दा. करंदीकर, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे अशा अनेक दिग्गजांचा. रात्रीचे नऊ वाजून गेलेले आणि प्रा. काणेकर हे अध्यक्षीय भाषण करत कवी संमेलनाचा समारोप करत होते. तोच अगदी अखेरच्या क्षणी त्यांच्या हातात एक चिठ्ठी पाठवण्यात आली. ‘मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. मलाही माझ्या कविता इथे वाचायच्या आहेत.’ ती चिठ्ठी वाचून दाखवतानाच अध्यक्ष प्रा. काणेकर म्हणाले की, ‘हे आता शक्य नाही. बराच वेळ झालेला आहे.’ पण त्यावर प्रगत साहित्य सभेचे कार्यवाहच म्हणाले, ‘अध्यक्ष महोदय, वाचू द्या कविता. त्यालाही द्या संधी.’ मग समोर बसलेल्या श्रोत्यांमधूनही सूर निघाला…अहो वाचू द्या, वाचू द्या! अन् त्या टॅक्सी ड्रायव्हरला मंचावर बोलावले गेले.

एक शिडशिडीत बांध्याचा, टोकदार नाकाचा, सावळ्या वर्णाचा, कुरळ्या केसांचा आणि पांढऱ्या मळकट वेषातील तो तरुण व्यासपीठावर आला. त्याने वाचलेल्या कविता ऐकून अख्खे सभागृह तर हादरून गेलेच, पण नंतर मराठीचे कविता विश्वही त्याने हादरवून सोडले. तो टॅक्सीचालक तरुण होता नंतर नावारूपास आलेले ‘पँथर’ पद्मश्री नामदेव ढसाळ! अन् त्यांना काव्यवाचनाची पहिली संधी मिळवून देणारे प्रगत साहित्य सभेचे कार्यवाह होते अर्जुन डांगळे. तेव्हापासून जुळलेली मैत्री ढसाळ यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपलेले अर्जुन डांगळे हे आज हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. दलित साहित्य आणि वैचारिक विश्वात त्यांनी ‘कलमबाजी’चे अर्धशतक कधीच झळकावलेले आहे.

1960 सालाच्या सुमारास मराठी साहित्याला हादरवून टाकणारे तीन नवे प्रवाह पुढे आले होते. त्यातला पहिला प्रवाह होता लघु-अनियतकालिकांचा, म्हणजे ‘लिट्ल – मॅगेझिन’च्या चळवळीचा. दुसरा प्रवाह म्हणजे कवी नारायण सुर्वे यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ आणि ‘माझे विद्यापीठ’ या कवितांमधून अवतरलेला, वास्तव जीवनाशी सांगड घालणारा मार्क्सवादी प्रवाह. तर तिसरा प्रवाह होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्स यांच्या विचारधारेतून विद्रोहाचा स्वर तीव्र करणारा बाबुराव बागूल यांच्या कथेतून अवतरलेल्या दलित साहित्याचा. 1960 नंतर मराठी साहित्याचा केंद्रबिंदू अभिजन वर्गाकडून बहुजन वर्गाकडे सरकत गेला. दलित साहित्याची चळवळ हा त्याचाच आविष्कार. त्यात अर्जुन डांगळे यांचा अगदी प्रारंभापासून सक्रिय सहभाग राहिला, पण राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेला त्यांचा ‘छावणी हलते आहे’ हा पहिला कवितासंग्रह तसा उशिराने म्हणजे 1977 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर डांगळे यांचे काव्यवाचन रेडिओवरून प्रसारित तर झालेच. शिवाय त्या वेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ‘आकाशवाणी’ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कवी संमेलनात मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मानही त्यांनाच देण्यात आला होता. ‘छावणी हलते आहे’ या कविता संग्रहानंतर ‘ही बांधावरची माणसं’ (कथासंग्रह), ‘दलित विद्रोह’, ‘आंबेडकरी चळवळीचे अंतरंग’, ‘निळे अधोरेखित’, ‘नवा अजेंडा : आंबेडकरी चळवळीचा’ हे लेखसंग्रह. ‘मैदानातील माणसं’, ‘झिलकरी चळवळीचे’ ही व्यक्तिचित्रे, ‘साहित्य आणि समाज : कार्यकारण भाव’ ही पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत तसेच डांगळे यांनी संपादित केलेली ‘पॉयझन्ड ब्रेड (इंग्लिश), ‘दलित साहित्य: एक अभ्यास’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे:निवडक वाङ्मय’, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड : काल आणि कर्तृत्व’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी गौरव ग्रंथ’ ही ग्रंथसंपदा मौलिक ठरली आहे. त्यातील ‘पॉयझन्ड ब्रेड’ या इंग्रजी ग्रंथामुळे दलित साहित्य हे देशाच्या इतर भागात पोहोचले. तसेच विदेशातील अभ्यासकांना एक संदर्भग्रंथ उपलब्ध झाला. डांगळे यांनी आपला तो ग्रंथ दक्षिण आफ्रिकेत राष्ट्राध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला यांना भेट दिला. त्या वेळी मंडेला यांनी आपले ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ हे आत्मचरित्र स्वतःच्या सहीनिशी डांगळे यांना भेट दिले.

राज्य सरकारने प्रकाशित केलेला ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: निवडक वाङ्मय’ हा ग्रंथ 1200 पानांचा आहे. सांगलीतील वाटेगाव येथून वडिलांसोबत पायी चालत मुंबईला आलेल्या अण्णाभाऊंच्या प्रतिभेने उंच भरारी कशी घेतली, याची कहाणी त्या ग्रंथातून पहिल्यांदा जनतेसमोर आली तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील अग्रणी, रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाची महती 364 पानांचा ग्रंथ सांगतो. डांगळे यांनी साहित्य-संस्कृती मंडळामार्फत राज्य सरकारकडे सतत आग्रह धरत संपादनाची जबाबदारी स्वीकारल्यामुळेच ते दोन्ही ग्रंथ प्रकाशित होऊ शकले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हे काम आपल्या चळवळीच्या महानायकांच्या विचारांना अभिवादन करण्याच्या भावनेतून मानधन न घेता केले आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्यावरील या संपादित ग्रंथाच्या प्रकाशनानंतर नाशिक येथे राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याच्या समारोपाला कुसुमाग्रज हे प्रमुख अतिथी होते. त्यांनी त्यावेळचे जिल्हाधिकारी रमेश उबाळे यांना सहज विचारले की, प्रदर्शनात सर्वाधिक विक्री कुठल्या पुस्तकाची झाली? त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘अर्जुन डांगळे यांनी संपादित केलेले अण्णाभाऊ साठे याच्यावरील पुस्तक’ असे सांगितले होते. त्यानंतर कुसुमाग्रजांनी डांगळे यांना नाशिकला आपल्या घरी बोलावून घेत त्यांचा सत्कार केला होता. इतकेच नव्हे तर त्या सत्कारावेळी काढलेला फोटो तात्यासाहेबांनी नंतर आपल्या सहीनिशी डांगळे यांना पाठवून दिला.

आंबेडकरी चळवळीत अर्जुन डांगळे यांचा प्रवास दलित साहित्य आणि पँथरच्या फुटीनंतर 1980 पासून प्रकाश आंबेडकर यांचे ‘सम्यक समाज आंदोलन’, भारिप, भारिप-बहुजन महासंघ, रिपाइं, शिवशक्ती-भीमशक्ती एकजूट असा झाला आहे. चार दशकांच्या या कालखंडात त्यांनी विपुल वैचारिक, राजकीय, सामाजिक लिखाण केले आहे, पण कुठल्याही पक्ष, संघटनेत ते असले तरी त्यांनी एकूणच आंबेडकरी चळवळीच्या प्रवक्तेपदाची भूमिका बजावलेली दिसते.

अर्जुन डांगळे यांचे बालपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाच्या काळात माटुंगा लेबर कॅम्प या श्रमजीवींच्या वसाहतीत गेले. तिथले कॉम्रेड शंकर नारायण पगारे हे कम्युनिस्टांच्या पहिल्या पिढीतील बिनीचे कार्यकर्ते होते. ते डांगळे यांच्या आईचे मामा होते तर दलित साहित्यिक बाबुराव बागूल हे शेजारीच राहायला होते. त्यामुळे मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाच्या समन्वयाचा तो कालखंड डांगळे यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा ठरला. चळवळीला एकारलेपणा येऊ नये, ती व्यापक आणि सर्वसमावेशक पायावर उभी राहावी या भूमिकेचे बिजारोपण आपल्या मनात संस्कारक्षम वयातच झाले, असे अर्जुन डांगळे नेहमीच सांगतात. ते सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट (माणगाव)चे अध्यक्ष होते. तेथे 36 एकरांच्या जागेवर आंतरभारती अनुवाद केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. परिवर्तनवादी चळवळींनी गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना एकमेकांचे हाडवैरी रंगवू नये. त्याऐवजी त्या दोघांच्या विचारांमध्ये संवादाच्या जागा शोधाव्यात, अशी भूमिका मांडणाऱ्या मोजक्या आंबेडकरवादी विचारवंतांपैकी अर्जुन डांगळे आहेत. त्यांच्या या समन्वयवादी भूमिकेचे मूळ बालमनावर सभोवतालच्या चळवळीने केलेल्या संस्कारातच आहे.

झोपडीवरचं मेणकापड: ‘गोलपीठा’ची रॉयल्टी
‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांचा ‘गोलपीठा’ हा कवितासंग्रह शिवसेनेचे माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांनी ढसाळांवरील आणि त्यांच्या कवितांवरील प्रेमापोटी 1972 सालात प्रसिद्ध केला होता. ढसाळ त्या वेळी मुंबईतील सर्वात उंच गणल्या गेलेल्या ‘उषा किरण’ या ताडदेव येथील टॉवरच्या पायथ्याशी एका झोपडपट्टीत राहायचे. त्या काळातील पावसाळ्यात त्यांच्या झोपडीच्या छपरावर मेणकापड घालण्यासाठी नारायण आठवले यांनी पाचशे रुपये दिले होते. ती रक्कम म्हणजे ढसाळ यांना मिळालेली ‘गोलपीठा’ची रॉयल्टी होती! माझ्या जिवाभावाच्या मित्राची म्हणजे नामदेवची गरिबीच्या काळातील, प्रतिकूल परिस्थितीतील ती आठवण मला आजही हेलावून सोडते, असे अर्जुन डांगळे सांगतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या