एचएनर्जीच्या गॅसपाईपलाईनचा मार्ग बदला, अन्यथा तीव्र आंदोलन

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

एचएनर्जीच्या जयगड ते दाभोळ या पाईपलाईनमुळे गोरगरीब शेतकऱ्यांची घरे उध्वस्त होणार आहेत. त्यामुळे एचएनर्जीच्या गॅस पाईपलाईनचा मार्ग बदला अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा बहुजन विकास आघाडीने निवेदनाद्वारे दिला आहे. बहुजन विकास आघाडीच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद कोंडवाडी या गावामधून एचएनर्जी कपनीची गॅसपाईपलाईन जाणार आहे. या गॅसपाईपलाईनला ग्रामस्थांचा विरोध आहे. गॅसपाईपलाईनच्या विरोधात यापूर्वीही ग्रामस्थांनी आंदोलने छेडत मोजणीला विरोध केला आहे. आज बहुजन विकास आघाडीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात जयगड ते दाभोळ या गॅसपाईपलाईनचा मार्ग बदला अशी मागणी केली आहे. निवेदनामध्ये एचएनर्जीची गॅसपाईपलाईन १८ मीटर रुंदीच्या पट्ट्यातून जाणार असून ती पाईपलाईन ३० इंच व्यासाची आहे. तसेच जमिनीच्या पृष्ठभागाखाली १ मीटर खोल टाकण्यात येणार आहे. त्याचा फटका येथील स्थानिक शेतकऱ्यांना बसणार असून आंबा, काजूची कलमे लावता येणार नसल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीने आपल्या निवेदनात केली आहे. तसेच वस्तीतून जाणाऱ्या या गॅसपाईपलाईनमुळे ग्रामस्थांची वाडी उध्वस्त होणार आहे. आवेळी या गॅसपाईपलाईनचा मार्ग बदला अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास बहुजन विकास आघाडी तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील हे वाटद गावाला भेट देणार असल्याचे बहुजन विकास आघाडीकडून सांगण्यात आले. यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, जिल्हाप्रमुख तानाजी कुळये, तालुकाप्रमुख टी. एस. दुडीये, आप्पा सोनावणे, अजय वीर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या