महिलेने महिलेचा लैंगिक छळ केल्याची दुर्मिळ तक्रार, आरोपी महिलेला अटक

समलिंगी चळवळ कार्यकर्ती, मानसिक आरोग्याचा पुरस्कार करणारी आणि TED Talks मध्ये वरचेवर दिसणारी दिव्या दुरेजा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण करणे, गुंगी येणारे पदार्थ देणे, मारहाण करणे आणि लैंगिक छळ करणे असे आरोप दिव्यावर करण्यात आले आहेत. तिने 26 वर्षांच्या फ्रान्सची रहिवासी असलेल्या महिलेसोबत हे प्रकार केल्याचं तक्रारीत म्हटलंय. दिव्याने मृतात्म्यांशी संवाद साधण्याच्या बहाण्याने आपला छळ केल्याचं तक्रारदार महिलेने म्हटले आहे. महिलेने महिलेचाच लैंगिक छळ केल्याची ही देशातील दुर्मिळ तक्रार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे की ती 17 जानेवारी रोजी गोव्याला आली होती. गोव्यात आल्यानंतर ती आरंबोल भागात वास्तव्याला होती. तिचे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहून दिव्याने तिच्याशी संपर्क साधला होता. यानंतर परदेशी महिलेने तिच्या एका मैत्रिणीचीही दिव्याशी ओळख करून दिली होती. या तिघींनी 23 फेब्रुवारीला भेटायचं ठरवलं होतं. परदेशी महिला 23 फेब्रुवारीला दिव्याला भेटायला गेली होती. अश्वेम इथल्या सी व्ह्यू रिसॉर्टमध्ये दोघींची भेट झाली. परदेशी महिलेची मैत्रिण यायला वेळ असल्याने दिव्याने तिला खोलीमध्ये जाऊ असं सांगितलं होतं. परदेशी महिलेला पाठदुखीचा त्रास होत होता. पाठदुखीसाठी औषध देण्याच्या नावाखाली दिव्याने मला गुंगीचं औषध दिलं असं पीडितेने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

शुद्ध हरपल्यानंतर दिव्याने आपल्याला 5 तास खोलीत कोंडून ठेवलं आणि आपला लैंगिक छळ केला असा आरोप पीडितेने केला आहे. झाड लावतेय असं म्हणून दिव्याने तिचा हात नको तिथे घातला होता आणि त्यानंतर ती मला चावली होती असा आरोपही पीडितेने केला आहे. परदेशी महिला पूर्ण शुद्धीत आल्यानंतर तिने कसाबसा त्या खोलीतून पळ काढला. तिने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली होती. 24 फेब्रुवारीला सकाळी पोलिसांनी दिव्याला अटक केली होती.

तपास अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याबाबत बोलताना सांगितले की दोन्ही महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अधिक माहिती मिळावी यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. वैद्यकीय अहवालावरून पीडित महिलेसोबत काहीतरी झाले आहे हे कळत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असं असलं तरी पीडित महिला आणि दिव्या ज्या खोलीत होत्या त्या खोलीतून ओरडण्याचे काहीच आवाज आले नसल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

तक्रारदार महिलेच्या मैत्रिणीने म्हटलंय की पीडिता ही दिव्यासोबत ‘डेट’ वर जाण्यासाठी तिच्या खोलीत गेली नव्हती. विचारधारा मिळत्या जुळत्या असल्याने ती दिव्यासोबत गप्पा मारण्यासाठी गेली होती. पीडितेने म्हटलंय की दिव्या तिचा छळ करत असताना चित्रविचित्र आवाज काढत होती. ती स्वत:ला लॉर्ड मॅन म्हणत होती आणि पीडितेला जंगलाची राणी म्हणून बोलावत होती. दिव्याला अटक झाल्याचे कळाल्यानंतर तिची आई गोव्याला तिला भेटायला गेली होती. यावेळी तिने तिच्या आईला ओळखलेच नाही. दिव्या कोणालाही तिच्याजवळ येऊ देत नसून तिचे मानसिक संतुलन ढळले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तिच्यावर सध्या दिल्लीतील एका मनोरुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या