हिंदुस्थान-चीन सीमेवर दिवाळी सेलिब्रेशन! एकमेकांना दिली मिठाई भेट

दिवाळीचे औचित्य साधत हिंदुस्थान आणि चीन या उभय देशांमधील 2020 पासून सुरू असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला. आज दोन्ही देशांतील सैनिकांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाई भेट दिली. चुशुल-मोल्डो बॉर्डर मीटिंग पॉइंटवर मिठाईचे आदान प्रदान करण्यात आले. यावेळी दोन्ही देशांतील सैन्य अधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई देत फोटो सुद्धा काढले.

हिंदुस्थान आणि चीन या देशांमध्ये 2020 पासून सीमावाद सुरू आहे. मात्र, हा सीमावाद अखेर दोन्ही देशांच्या संगनमताने संपुष्टात आला आहे. त्यानुसार दोन्ही देशांतील सैनिकांनी या भागातील अस्थाई चौक्या हटवण्याचे मान्य केले आणि चौक्या हटवल्या. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराला डेपसांग पठार आणि डेमचोक या दोन्ही ठिकाणी आता पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये लडाखमधील डेपसांग अंतर्गत 4 मुद्यांवर करार झाला आहे. मात्र, या करारामध्ये गलवान व्हॅली आणि डेमचोकमधील गोगरा हॉट स्प्रिंग्समध्ये गस्त घालण्या संदर्भात काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही.