स्वागत दिवाळी अंकांचे – १

चित्रलेखा दीपोत्सव

यंदाचा चित्रलेखा दीपोत्सव हा दिवाळी अंक विविध विषयांनी सजला आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर वेदांगी कुलकर्णी हिचा सुंदर फोटो आहे. अंकात ‘जातीधर्माच्या वेढय़ात छत्रपती शिवाजी महाराज’ हा डॉ. आनंद पाटील यांचा लेख वैशिष्ट्य आहे. निधी चाफेकर यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा ‘मृत्यू वीतभर अंतरावर’ हा लेख वाचनीय आहे, अभिनेत्री स्पृहा जोशी हिचा अमिता बडे यांनी घेतलेली ‘ऑलराऊंडर आयडल’ हा लेख वाचनीय आहे. अंकाच्या सदाबहार विभागात चित्रलेखा सदाबहार या भागामध्ये वजू कोटक, ज्ञानेश महाराव, सागर राजहंस, डॉ. अशोक राणा, नितीन बानगुडे पाटील, अमोल कडू, प्रमोद ताम्हणकर, इशिता यांसारख्या लेखकांचे लेख आहेत. तर रंग अभंग या विभागात सुनील खांडबहाले, संजय वायाळ, अशोक मुळे, शब्बीर अन्सारी, जेसन लुईस यांचे विविध विषयांवर आधारित लेख आहेत. लक्षवेधी या विभागात समीर करंबे यांनी लिहिलेला ‘लाईटची बदलती स्टाईल’ हा माहितीपर लेख आहे. तसेच सचिन परब यांच्या इंद्रपद हादरविणाऱ्या कविता, घनश्याम देशमुख यांची स्पेशल हास्यचित्रे यात समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

संस्थापक : वजू कोटक,

मूल्य : ५० रुपये, पृष्ठ : ९८

……………………………………………….

चारचौघी

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा दिवाळी अंक विविध विषयांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. कथा विभागात भा. ल. महाबळ, माधवी कुंटे, शरद वर्दे, गुरुनाथ तेंडुलकर, शेखर गजभार, सविता वाळिंबे-शेट्टी, सुमेध आदवडे, शुभा नाईक, प्रियंवदा करंड, स्नेहसुधा कुलकर्णी या लेखकांच्या कथांनी दिवाळी अंक नटला आहे. फिचर विभागात डॉ. आशिष देशपांडे यांनी मानसिक आरोग्यावर विशेष लेख लिहिले आहेत. यामध्ये मानवी मनाचा वेध घेणारा ‘असा मी, कसा मी?’, भ्रमप्रक्षेपण, रूपांतर, नाकारण, विरूपण अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपर लेख आहेत. त्याच बरोबरीने सिनेमा या विभागात स्मिता जोगळेकर यांनी लिहिलेली ‘टिटोनियमची कवटी आणि लोखंडाचं शरीर’ हा लेख वाचनीय आहे.

संपादिका : रोहिणी हट्टंगडी

मूल्य : १०० रुपये, पृष्ठ : २२८

…………………………………………..

श्री अक्षरधन

मराठी साहित्याच्या sसेवेत समर्पित असलेला ‘श्री अक्षरधन २०१७’ चा यंदाचा दिवाळी अंक वाचकांना विविध प्रकारच्या लेखांची मेजवानी घेऊन आला आहे. मराठी साहित्यातील सर्व प्रकारचे साहित्य या अंकाद्वारे वाचकांना वाचायला मिळेल असा प्रयत्न डॉ. रामदास गुजराथी आणि सरिता गुजराथी यांनी केला आहे. या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री रिमा लागू यांची मैत्रीची आठवण सांगणारा लेखिका प्रा. विद्या नाईक-वाडकर यांचा आणि, सिनेसृष्टितील अष्टपैलू अभिनेता विनोद खन्ना यांच्या आठवणी सांगणारा लेखक मनोहर विश्वासराव यांचा लेख तसेच माधुरी महाशब्दे यांनी घेतलेली संदीप पाठकची मुलाखत अशा वाचनीय लेखांचा संग्रह या दिवाळी अंकात आहे. शिवाय प्रवासवर्णन, गंगाराम गवाणकर यांची नाटकातील अध्यक्षीय कारकीर्द, आरोग्यविषयी पंचकर्म, मधुमेह यावरील माहिती असणारे, सामाजिक माध्यम, विविध सामाजिक संस्थांचा परिचय अशा विविध विषयांवरील लेख अक्षरधनच्या दिवाळी अंकात आहेत. याबरोबरच लहान मुलांकरिता लेख आहेत. बालमनाशी संवाद साधणाऱ्या एकनाथ आव्हाडांच्या नवीन कविताही आहेत. कविता वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी विविध विषयांवरील कवितांचा खजिनाच यामध्ये वाचायला मिळेल. अशा प्रकारे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांनीच वाचावा असा यावर्षीचा दिवाळी अंक आहे.

संपादक : डॉ. रामदास गुजराथी, सरिता अ. गुजराथी,

मूल्य : १२० रुपये, पृष्ठ : १६०