स्वागत दिवाळी अंकांचे – २

चंद्रकांत

‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकाचे यंदाचे ५४वे वर्ष आहे. केनियामध्ये घडलेल्या  खळबळजनक घटना व त्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित ‘मसाई’ ही कादंबरी या अंकात आहे. कादंबरीत सत्यघटना, आधुनिक इतिहास आणि कल्पनाविलास यांचा संयोग साधून मनोरंजन कथानक लेखक उमेश कदम यांनी गुंफले आहे. याबरोबरच प्रा. डॉ. अरुण हेबळेकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी, पु. रा.रामदासी आणि डॉ. श्रीकांत मुंदरगी यांचे अभ्यासपूर्ण लेख हे या दिवाळी अंकाचे विशेष आकर्षण आहे.

संपादिका : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी

मूल्य : २५० रुपये, पृष्ठ : २६८

……………………………………..

दक्षता

‘दक्षता’ हा दिवाळी अंक यंदा आरोग्य, राजकारण, दळण- वळण, कुटुंबव्यवस्था, पोलीस यंत्रणा, पर्यावरण, ऊर्जा, संगणक आणि सायबर जगत अशा विविध विषयांचा आढावा घेणारा आहे. तसेच चीनच्या १९६२ सालच्या आक्रमणात नेफामध्ये वालाँग येथे प्राणपणाने लढलेल्या ले. कर्नल श्याम चव्हाण यांच्या अभिजात साहित्यकृतीची सविस्तर झलकही वाचायला मिळेल. ‘वीरांची शौर्य बखर’ हा कर्नल चव्हाण यांचा लेख आपल्या सैन्याने चिनी आक्रमणाला कशी बेडरतेने टक्कर दिली याविषयी माहिती सांगणारा आहे.

संपादक : यशवंत नामदेव व्हटकर

मूल्य : ८० रुपये, पृष्ठ : २१२