स्वागत दिवाळी अंकांचे – ३

उल्हास प्रभात

उल्हास प्रभातच्या २३ व्या दीपावली विशेषांकात विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश केला आहे. आई मी जिजाऊ होणार – प्रा. महम्मद शेख, फेकलेले बाप – धनाजी बुटेरे, भाव-भावनांचा ओलावा आटला का? – शशिकांत काळे, मला तुझ्यासोबत पन्हाळा पाहायचा आहे – शीतल मालुसरे, पैसा झाला मोठा – विठ्ठल महिपती कुसाळे, अनोखी ताडोबा सहल – वैशाली विनायक चांदेकर, तरुण-तरुणी आत्महत्या का करतात? – चारुलता कुलकर्णी यासोबतच अनेकांचे लेख, कथा, कविता, मेनू, विनोद, टिप्स यांचा समावेश असून उद्योग जगतातील उगवता तारा निमेश जनवाड यांची नरेश इंगावले यांनी लिहिलेली कव्हर स्टोरी यांचा या अंकात समावेश आहे.

संपादक – गुरुनाथ पांडुरंग बनोटे

मूल्य – ४५ रु., पृष्ठ – १२८

अक्षरभेट

यंदाच्या अंकात राजकारण ते समाज- कारण, सहिष्णुता-असहिष्णुता, समाज- मन, समाजमाध्यमांची वेगवान वाटचाल, योगविद्या, भ्रूणहत्या, आजची प्रगत स्त्री. चित्रपटसृष्टी आदी अनेकविध विषयांवर प्रकाश टाकणारे दर्जेदार साहित्य आणले आहे. यात डॉ. द. ता.भोसले, सुधीर सुखटणकर, विनायक कुलकर्णी, नागेश केसरी, सुधीर कुलकर्णी, आलोक जत्राटकर आदींचे अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळतात. वसंत देशपांडे, संतोष प्रधान, डॉ.प्रतिमा इंगोले, किशोर आपटे यांचे राजकारण, शेतकरी आंदोलन यावरचे विचार मांडण्यात आले आहेत.

संपादक : सुभाष सूर्यवंशी

मूल्य : १०० रुपये, पृष्ठ : २००

आवाज

रोजच्या धकाधकीच्या  जीवनशैलीत थोडासा विरंगुळा हवा असेल तर ‘आवाज’ दिवाळी अंक नक्कीच वाचायला हवा. अंकाच्या साहित्य विभागात डॉ.यशवंत पाटील, श्रीकांत बोजेवार, संतोष पवार, विजय कापडी, उदयन ब्रम्ह, मंगला गोडबोले, अवधूत परळकर, मुकुंद टाकसाळे, अशोक मानकरी आदी लेखकांचे खुमासदार लेखन दाद देण्यासारखेच आहे. याबरोबरच पुंडलिक वझे, मंजार पार्डीकर, गजू तायडे, नीलेश जाधव यांची कथाचित्रे ओठावर हसू फुलवणारी आहेत. मंगेश तेंडुलकर, विकास सबनीस, प्रभाकर वाईरकर, संजय मिस्त्री, महेंद्र भावसार यांची हास्यचित्र- मालिका भन्नाट आहे. तर सुरेश सावंत, विवेक मेहेत्रे, ज्ञानेश बेलेकर, प्रभाकर झळके यांनी रेखाटलेली चुरचुरीत हास्यचित्रे मूड रिफ्रेश करणारी आहेत.

संस्थापक : मधुकर पाटकर

मूल्य : २५०रुपये, पृष्ठ : २३६

रामप्रहर दीपोत्सव

ज्यांनी संघर्ष करीत  अडचणींवर मात केली, आव्हानांना तोंड देत यशाचे शिखर गाठले, समाजासमोर आदर्श निर्माण केला अशा विविध मान्यवरांचा जीवनप्रवास यंदाच्या या दिवाळी अंकात आहे. प्रसिद्ध नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार सुधारक ओलवे, नृत्यांगना माया जाधव, संदीप गुरव, पोलीस अधिकारी मालोजी शिंदे आदींचा जीवनप्रवास या अंकात शब्दबद्ध करण्यात आला आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील मान्यवर चित्रकारांचा खडतर प्रवासदेखील अंकात आहे.

मुख्य संपादक : देवदास मटाले,

मूल्य : ७५ रु., पृष्ठ : १२८

दर्यावर्दी

सागरी जीवनाला वाहिलेले मराठी मासिक असे ब्रीदवाक्य असणाऱया ‘दर्यावर्दी’ने यंदा 75व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदाच्या दिवाळी अंकात ब्रीदवाक्यानुसार सागरी साहित्याची रेलचेल आहे. अमोल सरतांडेल यांची ‘ते थरारक बारा तास’ हा थरारक अनुभव, पंढरीनाथ तामोरे यांचा ‘अस्तित्व’, मच्छीमारांचे दैवत डॉ. चं. वि. कुलकर्णी हा श्री. श्री. देसाई यांचा लेख अंकात आहेत. याशिवाय भाग्यश्री नुलकर, प्रा. डॉ. सूर्यकांत, येरागी, मेजर डॉ. सुप्रिया येरागी, डॉ. भा. वा. आठवले, पांडुरंग भाबळ, समता गंधे, पंढरीनाथ रेडकर, शं. रा. पेंडसे, शुभदा पेडणेकर, गीता ग्रामोपाध्ये, जनार्दन पाटील, पांडुरंग वैती आदींचे साहित्य आणि गौरी कदम, विलास फडके, नवनाथ तांडेल, हरिश्चंद्र चाचड, श्वेता दोडे यांच्या कविताही अंकात आहेत.

संपादक : अमोल सरतांडेल,

मूल्य : ७५ रुपये, पृष्ठ : १२४

मराठी विज्ञान परिषद पत्रिका

या दिवाळी अंकात या वर्षी नद्यांचे शुद्धीकरण (उल्हास राणे), कृत्रिम बुद्धिमत्ता (मेघश्री दळवी), लेसरच्या प्रकाशात (आसावरी मराठे), वैद्यकशास्त्रातील अतिसूक्ष्म तंत्रज्ञान (डॉ. राम दातार), महाराष्ट्रातली जैवविविधता (किशोर कुलकर्णी), संयुक्त पदार्थ (योगेश सोमण), अस्मानी संकट (राजीव चिटणीस) हे लेख आहेत. त्याशिवाय मुंबई अग्निशमन दलाचे माजी अधिकारी, प्रताप करगुप्पीकर यांची प्रदीर्घ मुलाखत, शिरीष नाडकर्णी, डॉ. नितीन मोरे आणि स्वरा मोकाशी यांच्या विज्ञानकथा आहेत. बालगोपाळांसाठी ‘गंमत-जंमत’ सदरात चित्रपटांमधील ऑनिमेशन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली आहे.

संपादक मंडळ

मूल्य : १५० रुपये, पृष्ठ : १५६