स्वागत दिवाळी अंकांचे

118

तन्मय साहित्य

नामदेव ढसाळ, चंद्रकांत खोत आणि मानकरकाका या नामवंतांविषयी प्रदीप म्हापसेसकरांचे व्यक्तिचित्रण उल्लेखनीय आहे. तमाशाचा इतिहास आणि बदलते वेदनादायी रूप याविषयी रघुवीर खेडकर यांच लेख हृदयस्पर्शी आहे. ज्येष्ठ पत्रकार, कवी, कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर यांच्या आठवणीतल्या अनुभवांचे काही क्षण समृद्ध ग्रामीण जीवनानुभव देणारे ठरले आहेत. शिरीष पै यांचा आचार्य अत्रेंच्या जीवनातील काही घटना सांगणारा पुनर्प्रकाशित लेख वाचकांना अंतर्मुख करणारा आहे.
संपादिका : पूजा हारूगडे   मूल्य :७५ रु.,  पृष्ठ : १०४

न्यूजरूम लाईव्ह

गेल्या अनेक वर्षांत टीव्ही पत्रकारिता अनेक आव्हानांना तोंड देत बहरली. या क्षेत्राचे सामान्य माणसाला नेहमीच एक कुतूहलवजा आकर्षण असते. परंतु प्रत्यक्षात पत्रकाराचे जगणे अत्यंत धकाधकीचे, असुरक्षित आणि तणावाचे होत आहे. ही पत्रकाराची घुसमट लक्षात घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या अंकाची निर्मिती झाली आहे. या अंकातून पत्रकाराचा आवाज मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे अंकाच्या संपादकांचे म्हणणे आहे. यात कुणी या क्षेत्रातील आव्हानांचे धोके सांगितले आहेत तर कुणी आपली घुसमट, आपले जगणे मांडले आहे. अनेकांच्या आयुष्यातील बऱयावाईट प्रसंगांना शब्दबद्ध केले आहे. या माध्यमाचे अंतर्बाहय़ रूप कसे आहे, त्याचा आवाका, त्यातील माणसे आणि त्यांची गुणवत्ता याविषयी वाचकांना अवगत करून देणारे नामवंत पत्रकारांचे सगळेच लेख उल्लेखनीय, दर्जेदार व माहितीपूर्ण झाले आहेत. याकरिता स्वाती पाटणकर, प्रशांत कदम, ज्ञानदा कदम, अक्षय भाटकर, मोहन देशमुख, अर्चना कांबळे, दिनेश मौर्या, रवीश कुमार, मंगेश चिवटे, केतन वैद्य, सचिन गवाणे, वेदांत नेब, सागर कुलकर्णी, सुभाष शिर्के, वैभवी जोशी, प्रमोद चुंचूवार, विनोद जगदाळे आदी ज्येष्ठ तथा नवोदित पत्रकारांचे योगदान या अंकाला लाभले आहे.

संपादकीय मंडळ : कमलेश सुतार, पंकज दळवी, प्रशांत डिंगणकर, विशाखा शिर्के  मूल्य : १०० रु.,   पृष्ठे : १२८

इत्यादी

मान्यवरांचे विविध विषयांवरील दर्जेदार लेख, कथा यांची रेलचेल यंदाच्या अंकात आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ जी. एस. घुर्ये आणि प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत या गुरू-शिष्याच्या प्रेमळ नात्याचं रूपांतर हाडवैरात कसे झाले याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारा अंजली कीर्तने यांचा लेख, तसेच गणप्रिय गणिका- मुकुंद काळे, भारत-चीन संबंध – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मातृत्त्वाचा असर्जनशील प्रवास – डॉ. बाळ फोंडके, सती प्रथा आणि राजा राममोहन रॉय – अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, निर्वासितांच्या व्यथा, वेदना – निळू दामले, प्राण्यांचे प्रणयी जीवन – डॉ. विनया जंगले, इस्लाम – युद्धपरंपरा आणि हिंसाचार – अब्दुल मुकादम, बालगुन्हेगारांच्या निष्पाप जगात – अमिता नायडू, युरोपियन सिनेनायक – अभिजित रणदिवे आदी लेख विशेष उल्लेखनीय झाले आहेत. प्रणव सचदेव, गणेश मतकरी, पंकज भोसले, रवींद्र पांढरे यांच्या कथा आणि प्रतिमा जोशी यांच्या समष्टीच्या संवादिक कविता उत्कृष्ट आहेत. अंकाचे ‘फुलराणी’ मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.
संपादक : आशीष पाटकर   मूल्य : १६० रु.,   पृष्ठे : २१२

हास्यानंद

अंकात नामवंतांच्या विनोदी कथा, लेख, विनोदी – उपरोधिक कविता, वात्रटिका आणि भरपूर व्यंगचित्रे यांचा समावेश आहे. गिरिजा कीर, सुधीर सुखठणकर, मुकुंद गायधनी, अविनाश हळबे, भालचंद्र देशपांडे, अरुंधती भालेराव, प्रियंवदा करंडे, भा. ल. महाबळ, मो. बा. देशपांडे, सदानंद चांदेकर आदींच्या विनोदी कथा, लेख तसेच यशवंत सरदेसाई, विवेक मेहेत्रे, महेंद्र भावसार, कंदीकटला, जगदीश कुंटे, सुरेश क्षीरसागर, महादेव साने आदींची व्यंगचित्रे हास्यस्फोटक आहेत. शिवाय संजय घाटे, प्र. द. जोशी, भालचंद्र गंद्रे, रवींद्र जोगळेकर यांच्या चारोळ्या, वात्रटिका, विनोद वाचकांना हसविणारे आहेत. विवेक मेहेत्रे यांचे सेल्फीवर आधारित मुखपृष्ठ लक्षवेधक.
संपादक : विवेक मेहेत्रे  मूल्य :१५० रु., पृष्ठे : १६०

छोट्यांचा आवाज

बदकांची मैत्रीण (माधव गवाणकर), पिल्लू – सुरेश वांदिले, आभासी गेम – प्रवीण भिरंगी, मला उंच उडू दे – एकनाथ आव्हाड यांच्या गोष्टी तसेच एक मॉन्स्टर अक्राळविक्राळ, पुष्प महोत्सव – कल्पना शुद्धवैशाख, आई माझा गुरू – ज्योतीराम कदम हे नाटुकले आणि कविता, चित्रकथा, विनोद, कोडी, कॉमिक्स, हास्यचित्रे आदी मजकूर या अंकात आहे. छोट्यांच्या ज्ञानात भर टाकणारे व संस्कार करणारे उत्तम साहित्य या अंकात आहे.
संपादिका : वैशाली मेहेत्रे   मूल्य : १०० रु.,   पृष्ठे :१४४

मराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स

मराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स हा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथून प्रसिद्ध होणारा ‘डिजिटल दिवाळी अंक’ आहे. या अंकाचे यंदाचे तिसरे वर्ष. ‘मराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स’ या संस्थेच्या संस्थापिका आणि अंकाच्या व्यवस्थापकीय संपादिका ऐश्वर्या कोकाटे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या दिवाळी अंकासाठी त्यांना आशुतोष बापट (पुणे), श्रीनिवास आणि शैलजा माटे (लॉस एंजेलिस), शोभना डॅनियल, माणिक सहस्रबुद्धे, शीतल रांगणेकर यांचेही सहकार्य मिळाले आहे. हिंदुस्थानसह जगातील वेगवेगळ्या देशांतील मान्यवर, नवोदित लेखक, कवी आदींचा या अंकात सहभाग आहे. मनोरंजकतेबरोबरच वाचकांच्या ज्ञानात भर घालणारे वैचारिक साहित्य या अंकात आहे. शर्मिला माहूरकर (वडोदरा), डॉ. मुकुंद मोहरीर (सॅन दिएगो), विद्या हर्डीकर-सप्रे (कॅलिफोर्निया), किरण डोंगरदिवे (बुलढाणा), जयदीप भोसले (मुंबई), आदित्य कल्याणपूर (यूएसए), सचिन गोडबोले (पॅरिस), केतकी वासले (टोरांटो), निनाद वेंगुर्लेकर (मुंबई), स्वप्नील पगारे (लॉस एंजेलिस), गौरव वाडेकर (ऑस्ट्रेलिया), मीना नेरूरकर (फिलाडेल्फिया), विजयकुमार देशपांडे (सोलापूर), प्रतीक माने (पुणे), भरत उपासनी (नाशिक), उमाली पाटील (शिरपूर), श्वेता मालेकर-गुप्ता (हाँगकाँग), राहुल तेलंगे (बर्मिंगहॅम), पल्लवी रासम (सिंगापूर), अनुषा आचार्य (मुंबई), प्रियदर्शिनी गोखले (ऍरिझोना) आदींचे वाचनीय साहित्य अंकात आहे. दिशा मालपुरे यांचे मुखपृष्ठ आणि गंधार कात्रे यांचे मलपृष्ठ आकर्षक आहे. सुरुवातीला असलेले प्रतिमा खरे (पुणे) या मुलीचे पेंटिंगदेखील लक्ष वेधून घेते.
संपादिका : ऐश्वर्या कोकाटे   पृष्ठे ७६,   मूल्य : १३० रु.

आपली प्रतिक्रिया द्या