अमेरिकेत दिवाळीला सरकारी सुट्टी

अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या 44 लाखांहून अधिक हिंदुस्थानींना खूशखबर आहे. येथील कनिष्ठ सभागृहाच्या खासदार ग्रेस मेंग यांनी अमेरिकेत दिवाळी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करत त्याबाबतचे विधेयक मांडले आहे. त्यामुळे येथे दिवाळीला सरकारी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने त्याचा लाखो हिंदुस्थानींना फायदा होणार आहे.

जगभरातील लाखो लोकांबरोबरच अमेरिकेतही मोठय़ा उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतही दिवाळीनिमित्त सरकारी सुट्टी मिळावी म्हणून खासदार ग्रेस यांनी सभागृहात विधेयक मांडले असून शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली. कनिष्ठ सभागृहात मांडलेल्या दिवाळी सुट्टीच्या विधेयकाला ‘दिवाळी डे कायदा’ असे नाव देण्यात आले आहे.