थाटाची दिवाळी

>>डॉ. विजया वाड<<

कसं जगायचं… तुम्ही ठरवा… रडत… की गाणं म्हणत…

‘‘नेहमी नेहमी आपणासाठी कोणी तरी यावे म्हणून रडणे बंद आता.’’ काकासाहेब सुलुवैनींना म्हणाले. त्यांची चार मुले चार दिशांना होती. दोघे इंग्लंड नि यूएसला तर दोघे कुरुक्षेत्र येथे. एवढी मुले-नातवंडे असून एकही दिवाळीत जवळ नाही?

‘‘इन्नी, आम्हाला यायचे होते दिवाळीत, पण कुरुक्षेत्रात एवढय़ा मिठाईच्या ऑर्डरी आल्यात की, तुझे दोन्ही मुलगे नि दोन्ही सुना यांचे आठ हातही कमी पडतील. नेक्स्ट इयरला तुम्हा दोघांनाच इकडे घेऊन येतो.’’ रामचा फोन आला होता.

‘‘बघितलंत? पैसा झाला मोठा नि इन्नीचा मायेचा पदर खोटा.’’ सुलुवैनी रडत काकासाहेबांना म्हणाल्या.

‘‘हे बघ… प्रत्येकाला आपले जीवन आहे. आपण कशाला महत्त्व द्यायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी व्यवहाराला महत्त्व दिले म्हणजे तुझ्यावरची त्यांची माया पातळ झाली असे अजिबात नाही. हे दोन मुलगे हिंदुस्थानात आहेत म्हणून त्यांच्या येण्याची आशा धरितेस. त्या दोन टोणग्यांचे काय? दूर देशी जाऊन बसले नि सगळी सवलत घेऊन बसले ना ते?’’

काकासाहेबांचे बोल खरेच होते की. खोटे काय होते त्यात? सुलुवैनींनी अश्रू पुसले. सुरेख साडी परिधान केली नि काकासाहेबांस म्हणाल्या, ‘‘चला.’’

काकासाहेबांनी गाडी काढली नि गरमागरम जिलेब्या खरेदी केल्या. मग मस्त फरसाण घेतले. फरसाणवाल्याकडूनच कांदा, कोथिंबीर चिरून घेतले आणि मस्त मिरची ठेच. मग ‘माझा’च्या चार बाटल्या नि फुलबाज्या!

गाडी ठाण्याजवळच्या येऊर गावात आली. काकांचे दोस्त सरंजामे नाना त्यांची वाटच बघत होते. नानांच्या हाकेसरशी गावातली गरीब आदिवासी पोरं, त्यांचे मायबाप जमा झाले.

नेहमीच्या चकली-करंजीऐवजी भेळ फरसाण नि जिलेब्या? वर ‘माझा’ नि फुलबाज्या? वा! मस्त मज्जाच की! मुलेच काय मोठी माणसेही हरकली. काळय़ाकुट्ट पोराटोरांनी गोऱ्याचिट्ट सुलुवैनींच्या गळय़ाला गच्च मिठी मारून ‘थ्यांक्यू’ म्हटले नि सारा शीणभार ओसरून सुलुवैनी काकांना म्हणाल्या, ‘‘अहो, नाताळात पण येऊ या हं! मी मुलांसाठी केक बनवीन. नि तुम्ही नाताळबाबाचा झगा घाला नि भेटवस्तू द्या.’’ ऐशी आनंदाची दिवाळी झाली दोस्तांनो. नो रडगाणे.