दिवाळी सुट्टीचा फटका,फेरतपासणीचेही झाले कडबोळे

सामना ऑनलाईन,मुंबई

दिवाळीच्या सलग चार सुट्टय़ांमुळे मुंबई विद्यापीठाच्या फेरतपासणीच्या निकालाचे ‘कडबोळे’ झाले आहे.  या दिवसांत पुनर्मूल्यांकनाचे कामच झाले नसल्याने शिल्लक राहिलेल्या २४ हजार विद्यार्थ्यांचे निकाल लटकले आहेत. यातच हिवाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर नाहक ‘एटीकेटी’ची परीक्षा देण्याची वेळ आली आहे. यामुळे विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

काय होणार…

पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे हिवाळी सत्राच्या परीक्षांची तयारी करायची की एटीकेटी परीक्षेचा अभ्यास करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेचा नाहक भुर्दंड पडणार आहे.

मुंबई विद्यापीठाने रखडलेले सर्व निकाल जाहीर केले असले तरी आता जाहीर केलेल्या निकालातील गोंधळ आणि पुनर्मूल्यांकनाचे रखडलेले निकाल यामुळे विद्यापीठाच्या नाकीनऊ आले आहे. ऑनलाइन पेपर तपासणीतील गोंधळामुळे फेरतपासणीसाठी येणाऱया  अर्जांची संख्या कित्येक पटींनी वाढून ५२ हजारांवर गेली आहे. यातील २८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने आतापर्यंत जाहीर केले आहेत. तर अजूनही २४ हजार विद्यार्थ्यांचे निकाल बाकी आहेत.

निकालातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने दोन अधिकाऱयांचा समावेश असलेला ‘हेल्प डेस्क’ कलिना कॅम्पसमध्ये सुरू केला होता. मात्र आता हा ‘हेल्प डेस्क’ नसल्याने निकालासाठी परीक्षा विभागात येणाऱया विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे विद्यापीठाने ‘हेल्प डेस्क’ सुरू करावा अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

दिवाळीच्या सुट्टीमुळे काम बंद असले तरी शिल्लक राहिलेले पुनर्मूल्यांकनाचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात येतील. पुढील परीक्षा सुरू होण्याआधी सर्व निकाल जाहीर करू. ज्या  विद्यार्थ्यांना निकाल मिळाला नसेल तर तो तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल असे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक अर्जुन घाटुळे यांनी म्हटले आहे.

गोंधळ सुरूच

विद्यापीठाने राखीव असलेले सर्व निकाल जाहीर केल्याचे जाहीर केले, तरी अनेक विद्यार्थ्यांना अजून निकाल मिळालेला नाही. यात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसह विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.