डीजेआयचे स्पार्क ड्रोन

ड्रोन्स उत्पादनाच्या क्षेत्रात डीजेआय ही एक बलाढय़ कंपनी मानली जाते. काही दिवसांपूर्वीच डीजेआय कंपनीने आपले ‘माविक-प्रो’ हे अत्याधुनिक ड्रोन बाजारात उतरवले. या ड्रोनला ग्राहकांचा प्रतिसाददेखील उत्तम लाभला. या यशाने प्रेरित होऊन डीजेआय कंपनी आता याच लोकप्रिय ‘माविक-प्रो’चे मिनी मॉडेल बाजारात आणते आहे. ‘स्पार्क’ नावाने हे उत्पादन उपलब्ध होणार आहे. माविक-प्रोमधील सगळेच फीचर्स, जसे की आटोपशीरपणा, घडी घालता येणारी बॉडी आणि दमदार वेग हे त्याच्या मिनी व्हर्जन असलेल्या ‘स्पार्क’मध्येदेखील असणार आहे. ‘स्पार्क’ची किंमतदेखील तुलनेने अधिक किफायतशीर असल्याने त्याच्यावरती ग्राहकांच्या खरेदीसाठी उडय़ा पडतील असा अंदाज तज्ञांकडून लावला जात आहे. पंखांची घडी करून ठेवता येणाऱया या ड्रोनला विशेष करून सेल्फी आणि रेसलिंगचे उद्देश डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आल्याचे दिसते. ही ‘माविक-प्रो’ची सुधारित आवृत्तीदेखील मानली जात असल्याने यात काही अधिक विशेष फीचर्सदेखील मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.