Lok sabha 2019 : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार; डीएमकेचे आश्वासन

सामना ऑनलाईन । चेन्नई

तामीळनाडूमधील प्रमुख विरोधी पक्ष डीएमके अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यावर अक्षरशः आश्वासनांची खैरात केली आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात मोदी सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीमध्ये नुकसान सहन करावे लागलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपासून ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या सुटकेपर्यंतची आश्वासने पक्षाने मतदारांना दिली आहेत.

डीएमकेने राज्य सरकार आणि राज्यपालांकडे या प्रकरणातील दोषींच्या सुटकेची अनेकदा मागणी केली होती. त्यानंतर राज्यात राजकीय वाद सुरू आहे. आता लोकसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात पक्षाने या मारेकऱ्यांच्या सुटका करण्याचे आश्वासन दिले आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे पीडित कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचेही आश्वासन जाहीरनाम्यात आहे.

आणखी काही आश्वासने

  • पुद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा.
  • श्रीलंकेतून आश्रयाला आलेल्यांना नागरिकत्व.
  • मनरेगा योजनेअंतर्गत 150 दिवस रोजगार देण्याची हमी.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ, ‘नीट’मधून सुटका

राजीव गांधींचे मारेकरी  30 वर्षांपासून तुरुंगात

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी श्रीपेरुंबद्दूर येथे हत्या झाली होती. या प्रकरणातील दोषी पेरारिवेलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट प्यास हे गेल्या 30 वर्षांपासून तुरुंगात आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये तामीळनाडू सरकारने एक प्रस्ताव मंजूर करून राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांकडे पाठवला होता. त्यानुसार, तुरुंगात वैध असलेल्या दोषींची सुटका करण्याची परवानगी मागितली होती.

एआयएडीएमके गरिबी हटवणार

देशातील गरिबी हटवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर अम्मा राष्ट्रीय गरिबी निर्मूलन योजना एआयएडीएमकेने जाहीर केली आहे. एआयएडीएमकेच्या नेत्या आणि तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या नावाने ही योजना असणार आहे. पक्षाचे समन्वयक आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी आज जाहीरनामा जाहीर केला. त्याचबरोबर राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेल्या सात आरोपींना मुक्त करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.