मुंबई : जहाजांचे डम्पिंग

54

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<<

मुंबई ही देशाची आर्थिक व व्यापारी राजधानी आहे. देशाची निम्मी आयात व निर्यात येथून चालते. हिंदुस्थानी नौसेनेचे सर्वात सामर्थ्यशाली अंग वेस्टर्न नेव्हल कमांड आहे. याठिकाणी मोठय़ा विमानवाहू नौका, युद्धनौका, युद्ध साहित्य वाहून नेणाऱ्या नौका, पाणबुड्या आदी लढाऊ जहाजांचा मोठा ताफा आहे. त्यांची दुरुस्ती, देखभाल, अत्याधुनिकरण, माझगाव डॉकमधील लढाऊ जहाजनिर्मिती व दुरुस्ती आदींमुळे या परिसराला खूप महत्त्व आलेले आहे. शिवाय मुंबईच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या समुद्रात ‘बॉम्बे हायगॅस’चा पसारा आहे. बऱ्याच ठिकाणी येथील समुद्रतळ चाळिसेक फुटांवर आहे. याच समुद्रात विदेश संचार निगमचे ऑप्टिकल टेली कम्युनिकेशनचे तारखंड टाकलेले आहेत. त्यात एखादे जहाज अडकले तर विदेश संचार सेवा कोलमडू शकते. मागे युक्रेनच्या जहाजाने ही तोहमत आणली होती. मुंबई गोदीमध्ये जहाजांची गर्दी बारामास चालते. अत्यावश्यक साधनांची व नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या जहाजांनाही येथे बर्थ मिळत नाही. तसेच आपल्याकडे जहाज बुडीचे कायदे इतर देशांसारखे कडक नाहीत. काळजी घेण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे दुनियाभरची जीर्ण, कालबाहय़ झालेली जहाजे मुंबईच्या समुद्रात जलसमाधी देण्यासाठी आणतात. परिणामी मुंबईच्या बंदरातील समुद्रांची वाट लावतात. मुंबई जवळच्या समुद्रात अलीकडच्या काळात होणाऱ्या जहाजांची टक्कर होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, पण त्या संशयास्पद वाटू लागल्या आहेत. आतापर्यंत चाळिसेक जहाजे बुडाली आहेत. त्याशिवाय मच्छीमारांच्या कित्येक बोटी बुडाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ‘रत्ना’ हे मालवाहू जहाज बुडाले. थोडक्यात, मुंबईच्या समुद्रात बुडालेल्या जहाजांचे ‘डम्पिंग’ झालेले आहे. मुंबई बंदरांचे उपरोक्त महत्त्व लक्षात घेता मुंबईजवळ बोटी बुडविण्याचे थांबलेच पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या