हिंदुस्थानची लिंचिस्थान ओळख होऊ देऊ नका! लोकसभेचा सूर, मॉब लिंचिंगवर सभागृहात चर्चा

8

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते खुलेआमपणे गोरक्षकांचा बुरखा पांघरून मुसलमान आणि दलितांवर हल्ले करत आहेत. या मॉब लिंचिंगला सरकारचेच मूक समर्थन असल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे जगभरात हिंदुस्थानच्या प्रतिमेला तडा गेला असून हिंदुस्थानची ओळख लिंचिस्थान अशी होऊ देऊ नका असा सूर आज लोकसभेने व्यक्त केला.

लोकसभेत मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर तब्बल सहा तास नियम १९३ अंतर्गत चर्चा झाली. काँग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खरगे आणि सौगात राय यांनी चर्चेसंदर्भात नोटीस दिली होती. त्यानुसार झालेल्या चर्चेला मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरुवात करताना जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकार सत्तेवर आले आणि गेल्या ७० वर्षांतील शांततापूर्ण वातावरणाला चूड लागली. सरकारच्या समर्थनाच्या जोरावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते खुलेआमपणे कत्तली करत सुटले आहेत. त्यांना सरकारचे अभय आहे असा घणाघाती आरोप खरगे यांनी केला. आपल्या देशाची जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे, मात्र मोदी सरकारमुळे देशाची जागतिक स्तरावर लिंचिस्थान अशी ओळख होत आहे ती होऊ देऊ नका अशी आग्रही मागणी खरगे यांनी केली.

मोदी अमावस्या, पौर्णिमेलाच उगवतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात नसल्याबद्दल कटाक्ष टाकत खरगे यांनी पंतप्रधान केवळ अमावास्या-पौर्णिमेलाच सभागृहात उगवतात. एरवी ते गायब असतात. मोदींनी दररोज संसदेत यायला हवे असा टोला लगावला.

अत्याचाराच्या घटना काँगेसच्या कार्यकाळातच
मॉब लिंचिंगच्या नावाने आज विरोधक आक्रोश करत आहेत, मात्र अशा घटना काँगेसप्रणीत सरकार सत्तेवर असतानाच मोठ्या प्रमाणावर घडल्याचे सांगत केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजीजू यांनी विरोधकांवर पलटवार केला. भाषणस्वातंत्र्य म्हणजे देशविरोधी घोषणा देणे नव्हे असे बजावत रिजिजू यांनी या घटनांबद्दल खुद्द् पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. इतकेच नाही तर अशा घटना घडल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने कारवाई केल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

‘सामना’ काय म्हणतोय ते डोळे उघडे ठेवून वाचा
या चर्चेत सहभाग घेताना बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी यांचे तडाखेबंद भाषण झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महत्त्वाचा घटकपक्ष असतानाही शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून शिवसेनेने गोरक्षकाच्या बाबतीत घेतलली भूमिका कौतुकास्पद आहे. ‘सामना’ काय म्हणतोय ते डोळे उघडे ठेवून वाचा अशा शब्दांत सरकारला कानपिचक्या देत ‘सामना’चे लोकसभेत तोंडभरून कौतुक केले.

लिंचिंग करायचेय तर ते पाकिस्तान-चीनचे करा – शिवसेनेची भूमिका
देशभरात सुरू असलेल्या मॉब लिंचिंग घटना निषेधार्ह आहेत. हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आल्यानंतर हे घडत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकतेचे संस्कार घडवले. देशभरात शीखविरोधी दंगली पेटलेल्या असताना शीख बांधवांसाठी शिवसेनाप्रमुखांनी छातीचा कोट करून त्यांना वाचविले याची आठवण करून देत लिंचिंग वगैरे करायचे ते पाकिस्तान आणि चीनशी करा अशी भूमिका शिवसेनेने आज लोकसभेत मांडली. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मांडली. गाईला मारणाऱ्याला मारणे अधिक वेदनादायी असल्याचे सांगत गाय ही उपयुक्त पशू आहे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक विधानाचा दाखला देत खासदार सावंत यांनी इंदिरा गांधींसारख्या राजकीय विरोधकाला एकमेव मर्द म्हणण्याचे औदार्य शिवसेनाप्रमुखांकडे होते. असे औदार्य आजकाल दिसत नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी काही समाजघटकांनी शाकाहारी व मांसाहारी असा मुद्दा शिवसेनेविरोधात पेटवला याचाही उल्लेख त्यांनी केला. या देशात राहता तर मग वंदे मातरम्ला विरोध का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आपली प्रतिक्रिया द्या