नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालायच्या नाहीत, हायकोर्टाचे आदेश

सामना ऑनलाईन, नागपूर

चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात दोन मजुरांना ठार मारणाऱ्या वाघिणीला दिसताक्षणी गोळी घालण्याचे वनविभागाने दिले होते. या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका जेरिल बनाईत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्याच्या आदेश रद्द केला आहे.  न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रोहित देव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली .

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नरभक्षक वाघाला मारण्यासाठी काही निकष बनवले आहेत. या निकषांचं पालन करण्यात आलं नाही असं या याचिकेमध्ये म्हटलं होतं. असंच होत राहीलं तर धोकादायक नसणाऱ्या इतर वाघांना ठार मारले जाण्याची दाट शक्यता आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. . एनटीसीएच्या निकषानुसार वाघाला नरभक्षक घोषित करण्यापूर्वी त्याच्या पायाचे ठसे घेतले जातात,कॅमेरा ट्रॅपमधील फोटो गोळा करणे, मनुष्याला ठार मारल्याचे सबळ पुरावे जमा करणे हे निकष पूर्ण करावे लागतात.  त्यासोबतच कोणत्याही वाघाला थेट ठार मारण्याचा आदेश देता येत नाही. त्याकरिता त्या वाघाला बेशुद्ध करून पकडणे आणि नंतर त्याला प्राणीसंग्रहालयात ठेवण्याची तरतूद आहे. परंतु, त्या कोणत्याही तरतुदींचे पालन झालेले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला. या मागण्यांनुसार उच्च न्यायालयाने वाघाला थेट ठार न मारता त्याला बेशुद्ध करून पकडावे असे आदेश दिले आहेत.