५० पैसे किलोनेही कुणी कांदा घेईना

67

सामना ऑनलाईन, नाशिक

गाडीभाडे सुटण्याइतका भाव न मिळाल्याने हताश झालेल्या सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथील किशोर बारकू ह्याळीज या शेतकऱ्याने सायखेडा उपबाजार समितीत पंचवीस क्विंटल कांदा फेकला. निराश होऊन तो रिकाम्या हाती घरी परतला. मन हेलावून टाकणाऱ्या या व्यथेने हा शेतकरी अधिक चिंतातूर झाला आहे. मायबाप सरकार शेतकरीहिताचे पाऊल उचलणार कधी, असा सवाल किशोर ह्याळीज यांनी केला आहे.

सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथे किशोर ह्याळीज यांची चार एकर शेती आहे. दोन एकरात कांदा घेतला. कमी भाव असल्याने तो चाळीत साठविला. शेतमजुरांची मजुरी आणि घर खर्चासाठी छोट्या टेम्पोत पंचवीस क्विंटल कांदा भरून ते शनिवारी पिंपळगाव-बसवंत बाजार समितीत आले. नफेखोर व्यापाऱ्यांनी त्यांच्या कांद्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. ‘पन्नास रुपये क्विंटलनेतरी कांदा घ्या, तेवढे गाडीभाडे सुटेल’ असा टाहो त्यांनी फोडला, पण तीन-चार तास कोणीच फिरकले नाही.

सायखेडा उपबाजार समितीत नक्की विक्री होईल, असा सल्ला त्यांना काही शेतकऱ्यांनी दिला. मोठ्या अपेक्षेने ते तेथे पोहोचले, पण तेथील स्थिती त्याहून गंभीर. खरेदी करणारे मोजकेच व्यापारी भाव विचारायलाही तयार नाही. कांदा परत नेवूनही उपयोग नाही, रिकामा टेम्पो नेला तर प्रवासी भरून नेता येतील अन् डिझेलचा खर्च तरी सुटेल, असे ड्रायव्हरने सांगितले. निराश झालेल्या किशोर ह्याळीज यांनी बाजार समितीच्या आवारातच कांदा ओतला, हताश होवून रिकाम्या हाती घरचा रस्ता धरला.

रडगाणे सांगायचे कुणाला?
चाळीत अजून कांदा शिल्लक आहे, त्याला काय भाव मिळेल हे सांगता येत नाही. एक एकर डाळिंब बाग सध्यातरी चांगली आहे, पण ऐनवेळी भाव पडायला नको. एका रात्रीत नोटांचा कागद करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांचा असाच पालापाचोळा झाला तर त्याने रडगाणे सांगायचे कुणाला? देना बँकेकडून ठिबक सिंचनासाठी घेतलेले दीड लाखाचे कर्ज फेडायचे कसे, याची चिंता सतावतेय, असे किशोर ह्याळीज यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या