लाजिरवाण्या पराभवातून शहाणपण शिकणार का?

48

द्वारकानाथ संझगिरी
पुण्याच्या खेळपट्टीची ठेच विराट कोहलीच्या संघाला जोरदार लागली. पराभवाचे रक्त भळभळा वाहिलं. आता प्रश्न एवढाच आहे की, त्यातून आपण शहाणपण शिकणार का?
का आणि कुणाला अवदसा आठवली अशी पहिल्या दिवसापासून फिरणारी खेळपट्टी करण्याची? चेंडू नुसता फिरत नव्हता, उसळतही होता. शेन वॉर्नने पाहताक्षणी सांगितलं, २५० धावांची खेळपट्टी आहे. तो खेळत असता तर तीच खेळपट्टी १५० धावांची झाली असती. विराटला काय देवाने वर दिलाय प्रत्येक वेळी टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा? मग का, का, आपण पायावर कुऱ्हाड सॉरी… ओ’किफ मारून घेतला?
गेल्या नऊ कसोटींत (न्यूझीलंड-इंग्लंड-बांगलादेश) आपण ‘दादा’सारखे जिंकलो. त्यावेळी खेळपटट्या सुबुद्धपणे तयार केल्या होत्या. त्या फिरायच्या, पण शेवटच्या दोन दिवशी. त्यामुळे हिंदुस्थानी फलंदाजांच्या धावा व्हायच्या आणि ते दोन दिवस अश्विन-जाडेजाला फिरकीचं जाळं टाकायला पुरायचे. हा डावपेच आपण का बदलला?

ऑस्ट्रेलियाला घाबरून? की हा ऑस्ट्रेलियन संघ हा ढेकूण आहे. त्याला आरामात चिरडून टाकू असं आपल्या ‘ब्रेन ट्रस्ट’ला वाटलं. किंबहुना, ऑस्ट्रेलियन संघ हा असा संघ आहे की, पराभवाच्या कड्यावर एका हाताने लटकत असताना प्रतिस्पर्ध्याला दुसऱ्या हाताने खाली फेकून देण्याचा आधी विचार करतो. मग स्वतःला वाचवायचा. हा ऑस्ट्रेलियन संघ तसा नवखा आहे. तो हिंदुस्थानी दौऱ्यासाठी तयारी करीत होता त्यावेळी मी ऑस्ट्रेलियात होतो. त्यांच्या तयारीबद्दल मी वाचत होतो. फक्त वेगवान गोलंदाजांनी आपल्याला जिंकता येणार नाही. फिरकी गोलंदाजांची मदत लागणार हे त्यांनी ताडलं आणि त्याप्रमाणे श्रीराम, मॉण्टी पानेसर यांची मदत घेतली आणि आखणी करून ते मैदानात उतरले.

दुसरी गोष्ट, आपण फिरणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी चांगली खेळतो ही अंधश्रद्धा आहे. ती परंपरेतून चालत आलीय. विजय हजारे, विजय मांजरेकर, बोर्डे चांगले खेळत. सुनील गावसकर, वेंगसरकर, सचिन तेंडुलकरही चांगले खेळत, पण आजोबा आणि नंतर मुलांच्या पिढीपर्यंत हे ठीक होतं. नातवात ते गुण उतरलेले नाहीत. कारण आजोबा, मुले ही फिरणाऱ्या खेळपट्टीवर उत्तम फिरकी गोलंदाजांच्या खुराकावर वाढली. नातवांची पिढी ही वन डे, टी-२०च्या संस्कृतीत.

चांगल्या खेळपट्ट्याच्या आणि दोन-चार अपवाद वगळता सुमार फिरकी गोलंदाजांच्या खुराकावर वाढली. त्यामुळे चांगल्या खेळपट्टीवर याच ओकिफला ते फेकून देतील; पण चेंडू फिरला, उसळला, आजूबाजूला क्षेत्ररक्षकांचा फास आवळला गेला की त्यांचं ग्यानबा-तुकाराम सुरू होतं. बचाव करताना चेंडू जमिनीलगत ठेवणं कठीण जातं. एखादा सेहवाग होता, जो कुठल्याही खेळपट्टीवर वादळ उभं करायचा, पण तो देवाचा ‘डिझायनर्स आयटेम’ होता. बरं गंमत म्हणजे, ओ’किफने चेंडू वळवला कुठे? सरळ चेंडूवर तर बळी घेतले. हिंदुस्थानी फलंदाज चेंडू वळणार म्हणून खेळले आणि फसले.

१९८७च्या पाकिस्तानविरुद्धची सुनील गावसकरची ९६ धावांची खेळी ही मी खराब खेळपट्टीच्या फलंदाजीचं सर्वोत्कृष्ट प्रात्यक्षिक मानतो. त्यापेक्षा चांगलं फक्त परमेश्वर खेळू शकला असता. त्यावेळी पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज इक्बाल कासीमला बेदीने टीप्स दिल्या. त्याप्रमाणे कासीमने त्या खेळपट्टीवर चेंडू वळवण्यापेक्षा सरळ टाकण्यावर किंवा कमी वळवण्यावर भर दिला. ओ’किफने नेमकं तेच केलं. जाडेजा चेंडू वळवत राहिला. फलंदाज बिट होत राहिले, पण बाद झाले नाहीत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलियन फलंदाज आपल्यापेक्षा जास्त चांगले खेळले. जास्त आक्रमकपणे खेळले. ऑस्ट्रेलियन फलंदाज ही अशी जमात आहे की, जी पॉपिंग क्रिझची मर्यादा झुगारायची परंपरा पाळते. १९५६ साली ऑस्ट्रेलियाचा नील हार्वे बॅटिंगला आला. त्यावेळी सुभाष गुप्ते जगातला सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर होता. हार्वेने यष्टिरक्षक ताम्हाणेला सांगितले, ‘हा तुमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याने माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी मी त्याच्यावर हल्ला करेन.’ हार्वेने शतक ठोकले. १९६९ साली प्रसन्ना-बेदी-वेंकटसमोर मद्रासच्या आखाड्यात ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद २१ होती. टेडपाथने पुढे सरसावत त्यांचा समाचार घेतला आणि कसोटी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथनेही तेच केले. तो पुढे सरसावला, झुंजला. त्याने अश्विनला गोंधळवून टाकलं. आणि हो, स्टार्कच्या दोन खेळी आणि पुजारा-कोहलीच्या विकेटस्ही महत्त्वाच्या होत्या. इथून हिंदुस्थानी संघ कसा उठून उभा राहतो ते मला पाहायला आवडेल. त्याची खात्री आहे, पण ते सोप्पं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या