दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक; ३ पोलीस जखमी

38

सामना प्रतिनिधी । बीड

आष्टी तालुक्यातील कानडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेकीच्या घटनेनंतरही पोलिसांनी एका कुख्यात दरोडेखोराला अटक केली असून इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरोडेखोर आटल्या भोसले, सचिन भोसले, सोन्या व त्यांच्यासोबत इतर काहीजण मोटारसायकलवरून दरोड्याच्या तयारीने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना रविवारी रात्री मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने तत्काळ कानडी शिवाराकडे धाव घेत दोन वेगवेगळी पथके करून सापळा लावला. दरोडेखोर कानडी शिवाराकडे येत असल्याचे दिसून येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी या दरोडेखोरांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर मोटारसायकल घालण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेकही केली. या घटनेत पठाण आणि शिकेतोड हे कर्मचारी जखमी झाले. यादरम्यान एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

सचिन भोसले असे पकडण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव असून तो औरंगाबाद ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण मधील अनेक गुन्ह्यात ‘वांटेड’ आहे. त्याच्याकडून एक चॉपर आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर आष्टी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

आपली प्रतिक्रिया द्या