पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराला रुग्णाकडून मारहाण

पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराला रुग्णानेच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पेण येथे घडला आहे. यामुळे डॉक्टरांच्या व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत वृत्त असे की, वरेडी, ता. पेण येथील राजू गोपाळ पाटील (वय 37) या तरुणाचा तांबडशेत गावातील विहिरी जवळील रस्त्यावर मोटारसायकल घसरून अपघात झाला. या अपघातात राजू पाटील याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णाच्या डोळ्याला गंभीर दुखापत असल्याने डॉ. मनेषकुमार खोलवडीकर यांनी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यामुळे रागावलेल्या राजू पाटील याने डॉ. मनेषकुमार खोलवडीकर यांच्यावर हल्ला करून त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच डॉक्टरसह नर्स व सुरक्षा रक्षक यांना शिविगाळ केली. यावेळी मारहाण होत असताना आरोपीचे नातेवाईक यांनीही बघ्याची भूमिका घेतल्याने डॉक्टर, नर्स व उप जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भादवि कलम 353, 332 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. आम्ही दिवस-रात्र रुग्णांना सेवा देत असतो. मात्र राजू पाटील या रुग्णाने माझ्यावर केलेला हल्ला व माझ्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ व दमदाटी ही निंदनीय आहे. हल्ला व दमदाटी करणाऱ्या रुग्णावर कठोर कारवाई व्हावी.

– डॉ. मनेषकुमार खोलवडीकर, वैद्यकीय अधिकारी, पेण-उपजिल्हा रुग्णालय