झोपमोड झाल्याने डॉक्टरची चिमुरड्याला टॉर्चने मारहाण

40

सामना ऑनलाईन । मुंबई

झोपेतून उठवून तपासणीसाठी बोलवल्याने चिडलेल्या एका डॉक्टरने चिमुरड्याच्या डोक्यात टॉर्चने प्रहार केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात हा प्रकार घडला असून सहा वर्षीय मुलाच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सूर्यांश गुप्ता हा सहा वर्षांचा मुलगा अपस्माराच्या त्रासामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या बालरोग विभागात दाखल होता. शनिवारी त्याच्या तपासणीसाठी डॉ. गौरव मौर्य या निवासी डॉक्टरला पाचारण करण्यात आलं. डॉ. गौरव याने सूर्यांशला तपासण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्रासलेल्या चिमुरड्याने डॉक्टरला सहकार्य केलं नाही. त्यामुळे डॉक्टरला त्याची तपासणी करता आली नाही.

शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमाराला पुन्हा तपासणीसाठी गौरव याला पाचारण करण्यात आलं. त्यामुळे तो अर्धवट झोपेतून उठून तपासणीसाठी गेला. सूर्यांशचे डोळे तपासण्यासाठी त्याने टॉर्च उचलली. मात्र, यावेळीही मुलाने तपासणीला सहकार्य केलं नाही. गौरव याने अजून थोडे प्रयत्न केले. पण, सूर्यांशने आपले डोळे घट्ट बंद केले आणि तपासणी करण्यास विरोध करत राहिला. त्यामुळे चिडलेल्या गौरवने आपल्या हातातली टॉर्च सूर्यांशच्या डोक्यात घातली आणि तिथून निघून गेला. यावेळी मुलाचे आईवडील तिथेच उपस्थित होते.

गौरवच्या अशा वागण्याने गुप्ता दांपत्याला धक्का बसला. त्यांनी तिथे असलेल्या नर्स आणि डॉक्टरच्या मदतीने रक्तबंबाळ झालेल्या सूर्यांशवर उपचार केले आणि तडक पोलीस स्टेशन गाठलं. मुलाला मारणाऱ्या डॉ. गौरव मौर्यविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली. या घटनेनंतर गौरवने गुप्ता दांपत्याची माफी मागितली. रुग्णालय प्रशासनानेही तक्रार मागे घेण्याबद्दल विनंती केल्याचं गुप्ता दांपत्याचं म्हणणं आहे. पण, गुप्ता दांपत्याच्या तक्रारीनंतर रुग्णालय प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून डॉ. गौरव याला मेमो देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या