दु:ख मनात ठेवत दांपत्याने केले ३ महिन्यांच्या मुलीचे अवयव दान

83

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या तीन महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी अंत पाहणं नशिबात आलेल्या एका दांपत्याने मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेश सावरकर आणि अश्विनी सावरकर असं या दांपत्याचं नाव असून दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. एका अपघातात जखमी होऊन ब्रेनडेड झालेल्या आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हे जोडपं रविवारी रात्री एका समारंभाहून परतत होतं. घराच्या अंगणात प्रवेश करत असताना तिथून भरधाव वेगात चाललेल्या एका गाडीने सावरकर यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवाने उमेश यांना काहीही दुखापत झाली नाही. पण, त्यांची पत्नी आणि तीन महिन्यांची मुलगी मीरा या अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. व्हेंटिलेटरवर असलेल्या मीराला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. इतका मोठा आघात होऊनही या जोडप्याने आपल्या चिमुकलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

या जोडप्याच्या निर्णयामुळे अवयवदानाप्रति लोकांचा दृष्टिकोन बदलत असल्याची भावना वैद्यकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. ‘बाळांच्या मृत्यूनंतर सहसा डॉक्टर त्याच्या आईवडिलांना अवयवदान करण्यास सांगू शकत नाहीत. कारण, आईवडिलांवरचा आघात मोठा असतो. पण, अशा प्रकारे स्वतःहून जेव्हा काही पालक समोर येतात, तेव्हा तो कित्येक गरजू बाळांसाठी एक आशेचा किरण ठरतो’, अशी प्रतिक्रिया मीरावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

‘मीरा आमचं पहिलं बाळ होतं आणि त्यामुळे ती नेहमीच आमच्यासाठी खास असेल. जे झालं ते दुर्दैवी होतं. त्याने आम्हाला कितीही त्रास झाला असला तरीही आम्ही मीराचे अवयव दान करून दुसऱ्या एखाद्या बाळाच्या शरीरात तिला जिवंत ठेवू शकू’, अशी प्रतिक्रिया सावरकर दांपत्याने दिली आहे. मीराच्या अवयव दानासंबंधी पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या तिच्या अवयवांसाठी योग्य बालरुग्ण मिळाला नसल्यामुळे तिच्या अवयवांना संरक्षित केलं जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या