जिभेच्या ऐवजी डॉक्टरांनी मुलाच्या गुप्तांगाचे ऑपरेशन केले, खतना केल्याचा कुटुंबियांचा आरोप

उत्तर प्रदेशात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. आरोप आहे की, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका मुलाचं भलतंच ऑपरेशन झालं. या मुलाच्या जिभेवर शस्त्रक्रिया करायची होती. त्याऐवजी डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली. ही बाब जेव्हा मुलाच्या घरच्यांना कळाली तेव्हा त्यांनी डॉक्टरांवर आपल्या मुलाचा मुद्दा खतना केल्याचा आरोप केला. हिंदू संघटनांना ही बाब कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी मुद्दाम हा प्रकार केला असून खतना करून मुलाला मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप या संघटनांनी केला आहे.

बरेली जिल्ह्यातील बारादरी इथल्या हरीमोहन यादव यांच्या अडीच वर्षांच्या मुलाला बोलता येत नव्हतं. यामुळे त्याच्या जिभेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डेलापीर इथल्या एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. हरीमोहन यादव आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की मोहम्मद जावेद नावाच्या डॉक्टरने मुलावर जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्याचा खतना केला. हा प्रकार डॉक्टरने मुद्दाम केल्याचा आरोप हरीमोहन यांनी केला आहे. या डॉक्टरला आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत मुसलमान बनवायचे होते, म्हणून त्याने हे कृत्य मुद्दाम केले असं हरीयादव यांनी म्हटलं आहे.

ही गोष्ट कळताच हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसत जबरदस्त हंगामा केला. हिंदू मुलाचा खतना केला असून तुम्ही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा आरोप या कार्यकर्त्यांनी रुण्यालय प्रशासनावर केला. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेलं असून पोलिसांनी याबाबतचा तपास सुरु केला आहे. ज्या डॉक्टरवर आरोप केला जात आहे की त्याने चुकीचं ऑपरेशन केलं, त्या डॉ.मोहम्मद खान यांनी म्हटलंय की , या मुलाच्या घरचे त्याच्या जिभेचं ऑपरेशन करायला आले नव्हते. ते ज्या ऑपरेशनसाठी आले होते, ते ऑपरेशन मी केले आहे. हे प्रकरण त्यांच्याकडून विनाकारण मोठं केलं जात आहे.